भारत रत्न महर्षी कर्वे 

           सन१८ एप्रिल १८५८ रोजी महर्षी कर्वे यांचा जन्म झाला. त्यांचे संपूर्ण नाव धोंडो केशव कर्वे असे होते. त्यांना सर्व अण्णा असे म्हणत. कोकणात प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यावर पुढील शिक्षणासाठी ते मुंबईला आले. मॅट्रिकच्या परीक्षेत ते मुंबईतून १६ वे आले तर पदवी परीक्षेत विज्ञान व गणित या विषयात त्यांनी सर्वाधिक गुण मिळवले होते. त्याग हा त्यांच्या आयुष्याचा मूलाधार होता. लहानपणापासूनच समाजसेवेचे बाळकडू त्यांना पाजले गेले. पदवी परीक्षेनंतर सरकारी नोकरी न करता त्यांनी शिकवण्या घ्यायला सुरवात केली. मराठा हायास्कूल मध्येही ते शिकवीत असत. या कामातून मिळालेल्या पैशापैकी शे ५ टक्के रक्कम ते धर्मादाय फंडासाठी बाजूला ठेवीत. आपल्या गावी सार्वजनिक कामे व्हावीत म्हणून त्यांनी 'मुरुड फंड' योजना सुरू केली होती. समाजकार्यालाच परमेश्वर मानून आपला जास्तीत जास्त पैसा ते समाजासाठी  खर्च करत असत. त्यांची रहाणी अत्यंत साधी होती.
           ना. गोखले यांच्या विनंतीवरून ते पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून  नोकरी करू लागले. त्यांच्या प्रथम पत्नीच्या मृत्युनंतर त्यांना दुसर्‍या लग्नाचा आग्रह त्यांच्या आई वडिलांनी केला. तेंव्हा " लग्न करीन तर विधवेशीच" अस म्हणून आपल्या मित्राच्या बालाविधवा बहिणीशी ते विवाहबद्ध झाले. अर्थात त्यावेळच्या समाजाला हे मान्य झाले नाही. आणि समाजाने त्यांना वाळीत टाकले. आईच्या मृत्युनंतर तिचे अंत्यदर्शनही त्यांना घेता आले नाही; इतकी कडक बंधने समाजाने त्यांच्यावर लादली होती.
           त्यांच्या द्वितीय पत्नी आनंदाबाई यांनी त्यांच्या कार्यात स्वत:ला झोकून दिले. कर्वे यांनी अनाथ व परित्यक्ता स्त्रियांना आपल्या घरी  आश्रय दिला. सन १८९७ मध्ये "विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळा"ची स्थापना त्यांनी केली. तसेच पुण्याला पेरु गेटजवळ "अनाथ बालिकाश्रम मंडळा"ची स्थापना करून त्या प्रकल्पाला स्वतः पाच हजार रुपयाची देणगी दिली. पुढे १९०० मध्ये श्री गोखले यांनी आपली हिंगणे येथील जागा आश्रमाला विनामूल्य दिली. हाच "हिंगणे महिलाश्रम". त्यांनंतर "महिलाश्रम हायस्कूल", "पार्वतीबाई अध्यापिका शाळा", "आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळा" अशा संस्था महाराष्ट्रात निर्माण झाल्या. अण्णानी १९०७ मध्ये "महिला विद्यालयाचा" शुभारंभ केला. १९१६ मध्ये हिंगणे येथे मातृभाषेतून शिक्षण देणारे पहिले महिला विद्यापीठ सुरू केले. आणि कै. ठाकरसी यांच्या देणगीमुळे पुढे त्याचा विकास झाला. पुणे- मुंबईला महाविद्यालये सुरु झाली. त्यानंतर जवळजवळ वर्षभर जगभराचा प्रवास करून विविध शिक्षण संस्थांची व विद्यापिठांची पाहणी करून महिला विद्यापीठाला विकासाचा मार्ग दाखवला,आणि प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यासाठी परदेशात व्याख्यान देऊन पैसा उभारला. याच नथीबाई ठाकरसी विद्यापीठाला १९४८ साली सरकारी मान्यता मिळाली. समाजात समाजसेवी संस्था व समाजसेवक निर्माण व्हावेत म्हणून कर्वे यांनी 'निष्काम कर्म मठाची' स्थापना केली. वयाची ८७ वर्षे उलटलीतरी अण्णासाहेब कार्यरत होते. या वयात त्यांनी "ग्रामाशिक्षण मंडळ" व "समता संघाची" स्थापना केली.
           आज मुरुड या त्यांच्या जन्मगावी अण्णांच्या घरात 'कर्वे वाचनालय' सुरु करण्यात आले आहे. भारत सरकारने त्यांची प्रतिमा असलेले पोस्टाचे तिकिटही काढले.  "भारतरत्न" या गौरवशाली पुरस्काराने त्यांना सन्मानीत करण्यात आले.