भारतीय वायुसेना 

            सन १९२५ मध्ये तत्कालिन चीफ ऑफ द जनरल स्टाफ - सर अँड्रयू स्कीन यांच्या अध्यक्षतेखाली स्कीन कमिटी स्थापन झाली. आणि त्यांच्या निर्देशानुसार भारतीय वायुसेना अधिनियम  अस्तित्वात आला. या समितीने पहिल्या महायुद्धात भारतीयांनी वैमानिक क्षेत्रात केलेल्या  कमगिरीची प्रशंसा  करण्यात आली. आणि भारतीय सेनेच्या अंतर्गत एक वायुसेना असावयास हवी; असे सुचविले. आणि त्यांना   इंग्लंड एअरफोर्स कॉलेज, क्रॅनवेल येथे उड्डाण प्रशिक्षणासाठी पाठवावे असे सुचविले. या शिफारशीनुसार सहा भारतीयांचे एक दल प्रशिक्षाणासाठी रवाना झाले.
            त्यानंतर ८ ऑक्टोबर १९३२ रोजी इंडियन एअर फोर्स अ‍ॅक्ट लागू करण्यात आला. आणि हाच भारतीय वायुसेनेचा स्थापना दिन होय. त्यानंतर रेल्वे वर्कशॉपमधील  २२ अनुभवी तंत्रज्ञानांना अ‍ॅप्रेंटिस - एअर -क्रॅफ्ट हँड म्हणून भरती करण्यात आले. आणि १ वर्षाच्या प्रशिक्षणानंतर त्यांना 'हवाई शिपाई' अशी उपाधी देण्यात आली.
           १ एप्रिल १९३३ रोजी ट्रीग - रोड कराची येथे प्रथम फ्लाईटची स्थापना झाली. त्यात सहा अधिकारी व २२ हवाई शिपाई आणि चार 'वापिती' विमाने होती.
           सन १९३९ च्या दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी सुब्रोतो मुखर्जी हे पहिले भारतीय स्कॉड्रन कमांडर झाले. त्यानंतर भारतीय वायुसेनेचा विस्तार होऊ लागला. भारताच्या समुद्रतटांचे रक्षण करण्यासाठी कलकत्ता, विशाखापट्टणम, कोचीन, मुंबई आणि कराची येथे कोस्टल - डिफेन्स - फ्लाईटसची स्थापना करण्यात आली.
           डिसेंबर १९४३ पर्यंत भारतीय वायुसेना ही नऊ स्क्वॉड्रनची शक्तिशाली सेना बनली. त्यापैकी दोन स्क्वॉड्रनमध्ये  'व्हेंजस'  डाइव्ह बाँबर्स व सात स्क्वॉड्रनमध्ये 'हरिकेन' नावाची विमाने होती. नंतर १९४५ मध्ये आकाशातून आग वर्षवणार्‍या 'स्पिटफायटर' विमानांचा भारतीय वायुसेनेत समावेश झाला. १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला. स्वतंत्र भारताच्या नव्याने संगठित झालेल्या भारतीय वायुसेनेचे प्रथम कमांडर- इन- चीफ - एअर मार्शल म्हणून थॉमस एल्महर्स्ट यांची निवड करण्यात आली.
           सन १९४८ मध्ये भारतीय वायुसेनेत जेट विमाने सामील झाली. कानपुरला 'लिबरेटर' बॉम्बर विमानाचा एक स्क्वॉड्रन तयार करण्यात आला. सन १९५४ मध्ये भारतीय वायुसेना पूर्ण पणे स्वायंत्त बनली. एअर मार्शल सुब्रोतो मुखर्जी हे वायुसेनेचे पहिले भारतीय कमांडर इन चीफ बनले. आणि १९५५ मध्ये पहिले चीफ ऑफ द एअर स्टॉफ म्हणजे वायुसेना अध्यक्ष बनले.
           सन १९७१ पर्यंत भारतीय वायुसेनेत हंटर, वापिती, टायगर मीग, स्पीटफायर, टेम्पेस्ट, व्हम्पायर, तुफानी, कॅनबेरा, नॅट, मिग, मरुत सारखी विमाने, अचूक मारा करणार्‍या विमानवेधी तोफा आणि प्रक्षेपास्त्र, दूरदर्शी शाक्तिशाली रॅडार्स यांचा समावेश झाला होता. आपल्या वायुसेनेत एयर-टू- एयर रिफ्युलिंग करणारी टँकर विमाने, बाईग, डॉर्नियर, मीग, मिराज, जाग्वार, सु - ३० इ. अनेक विमाने, वैमानिक रहित सर्वेक्षण विमाने आणि अत्याधुनिक दुरगामी अशा प्रक्षेपास्त्रांचा समावेश आहे.
            आपली भारतीय वायुसेना संपूर्णपणे भारतीय आहे. "नभः स्पृशं दीप्तम' हे त्याचे बोधवाक्य आहे. त्याच्या तत्वप्रणालीतील मुलतत्त्वांची सुरवातही "अथ चेत्त्वमिमं धर्म्यं, सड्ञग्रामं न करिण्यासि | ततः स्वधर्म कीर्तिच हित्त्वा पापमवाप्स्यसि|' या गीतेतील संस्कृत श्लोकाने झाली आहे. वायुसेनेच्या बोधचिन्हामध्ये गरूड आणि अशोक स्तंभ यांचा समावेश आहे.
            युद्धाशिवाय दुष्काळ, भुकंप , पूर, अपघात, वादळे अशा अनेक आपत्तीप्रसंगी लोकांना मदतीचा हात देण्याचे काम वायुसेना करते. तसेच राजस्थानच्या रेताड वाळवंटात आकाशातून बिया विखुरण्याचे, देशात इतरत्र पेट्रोल कोळसा लोखंड इ. खनिज पदार्थाचे सर्वेक्षण करंण्याचे कामही वायुसेने कडेच आहे.