आद्य शंकराचार्य 

संपूर्ण भारतातील हिंदूंचे पहिले धर्मगुरू म्ह्णून आद्य शंकराचार्यांना ओळखले जाते. केरळ राज्यातील कालडी नावाच्या गावात सन ७८८ सालच्या वैशाख शुद्ध पंचमीला नंबुद्री ब्राम्हण कुटुंबात आद्य शंकराचार्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विश्वजित व आईचे नाव विशिष्ठा असे होते. बालपणीच छत्र हरवलेल्या या मुलाचा सांभाळ आईने उत्तम रितीने केला. वयाच्या आठव्या वर्षीच त्यांचा वेदवेदांगांचा अभ्यास पूर्ण झाला होता. अल्प वयातच संन्यास ग्रहण करण्याची ओढ लागल्याने त्यांनी बालवयातच संन्यास घेऊन घराचा त्याग केला, आणि मघ्यप्रदेशातील गोविंद भगवत्पाद नावाच्या गुरूकडून दीक्षा ग्रहण केली. भगवत्पाद गुरूकडून योगशास्त्राचे ज्ञान घेऊन त्यांनी प्रयाग काशीकडे प्रयाण केले.बाराव्या वर्षीच त्यांनी काशी येथे वेदांतावर प्रवचने द्यायला सुरूवात केली. '' मानवी देह हेच ईश्वराचे मंदीर आहे, ईश्वर  सर्वत्र भरलेला आहे.प्रत्येक व्यक्तित ,वस्तूत ईश्वराचा वास असल्याने कोणतीही वस्तू अगर व्यक्ती तुच्छ नाही.'' हाच त्यांच्या प्रवचनाचा विषय असे. याचसुमारास त्यांनी 'ब्रम्हसूत्रावरील आपले प्रसिद्ध भाष्य लिहिले. या भाष्यातून त्यांनी  'मायावादा'चे विवेचन केलेले आहे. आपल्या 'केवलदैवत' तत्त्वज्ञानात त्यांनी 'ब्रम्ह सत्यं जगत मिथ्या' हे सूत्र मांडले.यालाच ' वेदांत दर्शन' असे म्हटले जाते. वेदांत मार्गाच्या प्रवर्तनासाठी शंकराचार्यांनी ग्रंथरचना केली '.प्रस्थानत्रयी 'वरील त्यांची भाष्ये अधिकृत मानली जातात. प्रस्थान म्हणजे मार्ग. 'उपनिषदे' 'भगवत गीता' आणि 'ब्रम्हसूत्रे' हे ते तीन मार्ग होत. धर्माच्या व देवाच्या नावावर चाललेल्या  कर्मकांड व आहारविहाराला पायबंद घालण्यासाठी शंकराचार्यांनी 'अद्वैतसिद्धांत' जोरकसपणे मांडला. "ईश्वर कोणत्याही सगुण रूपापेक्षाही अधिक व्यापक व विशाल आहे" ही शिकवण त्यांनी दिली.

वयाच्या सोळा ते अठरा वर्षापर्यंत त्यांनी ज्ञान संपादन करून ग्रंथलेखनाचे काम पूर्ण केले. व आपल्या तत्त्वज्ञानाची मांडणी पूर्ण करून प्रचारकार्यास आरंभ केला. त्यांना बरेच अनुयायी व शिष्य मिळाले. मग आपला शिष्यपरिवार घेऊन ते काश्मिरमध्ये सर्वपीठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या शारदामंदिरात गेले. तेथील पंडितांशी वादविवाद घालून आपली श्रेष्टता सिद्ध करणारे ते पहिले दक्षिणात्य पंडीत होते.सर्वज्ञपीठाचे तसेच संपूर्ण भारत देशाचे आचार्यपद मिळणे ही त्यांच्या आयुष्यातली गौरवाची घटना होती.त्यानंतर त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमण केले. भारतात धार्मिक एकता साधण्यासाठी चार दिशांना चार मठांची स्थापना केली. उत्तरेला बद्रीनाथ, दक्षिणेला कांची व शृंगेरी, पूर्वेला जगन्नाथपूरी, पश्चिमेला द्वारका ही पीठे आजही प्रसिद्ध आहेत.

आद्य शंकराचार्यांना वयाच्या बत्तीसाव्या वर्षी निर्वाणप्राप्ती झाली. सन ८२०मध्ये त्यांनी या जगाचा निरोप घेतला.आपल्या 'उपदेश पंचकं'मध्ये आचार्यांनि जो उपदेश केला आहे;तो समाजाला आणि व्यक्तिला सदाचारी व सत्प्रवृत्त बनवणारा आहे. हा उपदेश पुढील प्रमाणे आहे: "दररोज धर्मग्रंथांचे अध्ययन करावे.आपली कर्तव्ये व्यवस्थित पार पाडावित. वाईट विचारांना मनात थारा देऊ नये. अहंकाराचा त्याग करावा. सदचारी व बुद्धीमान लोकांची संगत धरावी. वेदांतावरील प्रवचनांचे श्रवण करावे. न्यायाने वागावे. भांडणांपासून दूर रहावे.गुरूजनांचा आदर करावा.जे मिळाले आहे त्यात संतोष मानावा.सहिष्णूता वाढवावी. नियमित प्रार्थना करावी. वाणी व कर्म यात उदारता असावी. एकांतात बसून चिंतन करावे.".