शिव शंकर 

फार फार पूर्वीपासून भारतात शिव शंकराची पूजा करण्यात येते. रामायण महाभारतात ही त्याचा उल्लेख आहे. शैव धर्म आसेतू हिमाचल पसरलेला आहे. प्राचीन काळी जी तीर्थक्षेत्रे पुण्यप्रद मानली जात होती; ती बरेचशी शैव आहेत. आजही काशी - रामेश्वर, चार धामे, बारा ज्योतिर्लिंगे ही सारी ठिकाणे  तीर्थक्षेत्रे मानली जातात. तेथे शिवाचीच पूजा होते. शिवाची बारा ज्योतिलिंगे स्वयंभू आहेत. आणि ती सार्‍या देशभर पसरलेली आहेत. याचाच अर्थ पूर्वीपासूनच संपूर्ण भारतात शैव धर्म पसरलेला होता. ही बारा ज्योतिर्लिंगे पुढील प्रमाणे.
  १) सोमानाथ - सौराष्ट्र.
  २) मल्लिकार्जुन - आंध्र प्रदेश.
  ३) महांकाळ - मध्य प्रदेश.
  ४) अमलेश्वर किंवा ओंकार - मध्य प्रदेश.
  ५) केदारनाथ - हिमालय.
   ६) वैजनाथ - महाराष्ट्र, बंगाल.
   ७) नागनाथ - महराष्ट्र व उत्तर प्रदेश.
  ८) रामेश्वर - तामिळनाडू.
  ९) घृणेश्वर - महराष्ट्र.
 १०) त्र्यंबकेश्वर - महराष्ट्र.
 ११) भीमाशंकर - महराष्ट्र.
 १२)विश्वेश्वर  - उत्तर प्रदेश .
शैव संप्रदायानुसार 'शिव' हाच जागाचा उत्पत्तीकारक आहे. म्हणूनच आपण शिवलिंगाची पूजा करतो. राजा कनिष्काचा मुलगा हुइष्क याने दुसर्‍या शतकापासून शिवलिंगाची पूजा सुरु केली. भग व लिंग ही दोन जननेंद्रिये प्राणीसृष्टीच्या उत्पत्तीला कारणीभूत ठरतात; हे लक्षात आल्यावर या दोन्ही इंद्रियांना महत्त्व प्राप्त झाले. आणि मग भगाचे प्रतीक असलेली शाळुंका व लिंगाचे प्रतीक असलेले लिंग हे दिन्ही मिळून शंकराची पिंड तयार झाली.
शिव म्हणजे मंगलमय, कल्याणकारक तत्त्व. म्हणूनच शिवालाच "शंकर" असेही म्हणतात. शं म्हणजे कल्याण. करोति म्हणजे करतो. कल्याण करणारा तो "शंकर". पुराणोत्तर काळात उत्पत्ती, स्थिती व लय या तिन्हींचा कर्ता शिव असे मानून त्याला 'महादेव' असे म्हटले जात असे. वेदोत्तर काळात सौम्य रुप असलेला हा शिव वेद काळात मात्र उग्र रुपात "रुद्र" नावाने पुजला जाई. पुराण काळात "महेश" या नावाने संहारक देवता म्ह्णून त्याची पूजा होत असे.
कापुरासारखा पांढरा रंग असलेला म्हणून शंकराला 'कर्पूरगौर' असे म्हटले जाते. आल्हादकारक असा चंद्र कपाळावर धारण करणारा म्हणून 'भालचंद्र', समुद्रमंथनातून बाहेर आलेले हलाहल विष प्राशन करुन जगाला विनाशापासून वाचवताना त्याचा कंठ काळा नीळा झाला म्हणून 'नीलकंठ' अशा नावानेही शिवाचा उल्लेख केला जातो. शिवाच्या डोक्यावर, गळ्यात, दोन्ही दंडात, दोन्ही मनगटात, कमरेत आणि दोन्ही मांड्यात असे एकूण नऊ नाग असतात;  म्हणून शंकराला 'भुजंगपतिहारी' असे म्हणतात. कैलास पर्वत हेच निवासस्थान असणारा म्हणून 'कैलासराणा'; सहजतेने प्रसन्न होणारा व प्रसन्न झाल्यावर  काहीही देणारा म्हणून 'आशुतोष' आणि भूतांचा स्वामी म्हणून 'भुतनाथ' अशी अनेक नावे शिवाला आहेत.
एकंदरीत कैलास पर्वतावर रहाणारा, डोक्यावर गंगा धारण करणारा, कपाळी भस्माचे तीन पट्टे ओढणारा, तीन नेत्र असलेला, अंगावर नाग खेळवणारा, हातात डमरु  परशू , व त्रिशुळ धारण करणारा, रुद्राक्षाचा वापर करणारा , वाघाच्या कातड्याचे वस्त्र व आसन वापरणारा असे शिवाचे रुप आहे.
  विविध स्थलकालानुसार व त्याच्या कार्यानुसार शिवाची अनेक रुपे व नावे आहेत. त्यातील काही पुढील प्रमाणे --
१) रुद्र - वेदकाळात शंकराचे रुप भयकारक होते म्हणून रडविणारा या सर्थाने "रुद्र" असे म्हटले जाई. वृष्टी करून वर्षा ( पाऊस) पाडणारा आणि अत्याधिक प्रजननक्षमता असलेला या अर्थाने रुद्रालाच "वृषभ" असेही वेदकाळत म्हणत.
२ भैरवनाथ भै: म्हणजे प्रकाश लहरी. आणि रवः म्हणजे नाद. प्रकाश लहरी व नाद लहरी जेथे एकत्र नांदतात
त्या पृथ्वीचा नाथ; म्हणून भैरवनाथ. महाराष्ट्रात ग्रामदेवता म्हणून भैरवनाथाची पूजा केली जाते.
३) अर्धनारी नटेश्वर - मानव समाज मूर्ती घडवण्याइतका सुसंस्कृत झाल्यावर योनि व लिंग ही प्रतिके अर्धनारी नटेश्वराच्या रुपात आकाराला आणली गेली. या रुपात स्त्री कारकत्व व पुरुष कारकत्व समान असते. शिवाचे उजवे अर्धे शरीर नारीचे बनलेले असते.
४) नटराज - शिवाची सगुण अवस्था म्हणजे नटराज. या रुपात शिवाने नाट्यकला प्रवर्तित केली. त्याला आद्यनट असेच म्हटले जाते. म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमात नटराजाची पूजा केली जाते.
५)किरात - हे शिवाचे कापालिक रुप आहे.कपाली म्हणजे माणसाची कवटी धारण करणारा शिव. त्याच्या भक्तांना कापालिक म्हटले जाते. या रुपात तो क्रिडाविलासात मग्न असतो. तो मद्य प्राशन करतो. त्याच्याभोवती अनेक स्त्रिया असतात. आणि भूतगण नाचत असतात. भगवती उमाही त्याच वेशात असते. 
         ओम नमः शिवय हा शिवाचा जप आहे. शंकराला अभिषेक सतत केला जातो. अभिषेकाने शिवलिंग नेहमी ओले ठेवले जाते. शंकराच्या देवळात प्रदक्षिणाही अर्धीच घालायची असते. शंकराला बेलपत्र वाहतात. तुळस अजिबात चालत नाही. पांढरे फुल शंकराला प्रिय असते. जेष्ठ वद्य अष्टमीला शंकराला निळी फुल व महाशिवरात्रीला केवड्याचे कणीस वाहतात.