तमाशा 

           मुसलमानी राजवटीत महाराष्ट्रात रुढ झालेली लोककला म्हणजे तमाशा. तमाशा हा मुळात अरबी शब्द आहे. सवाई माधवराव व दुसरे बाजीराव यांच्या कालखंडात तमाशा विशेष नावारुपाला आला. आणि तेंव्हापासून आतापर्यंत त्याची लोकप्रियता टिकून राहिली आहे. खेडेगावात अजूनही तमाशाची रंगभूमी जागृत आहेच पण मुंबई सारख्या मोठ्या शहरातही तमाशाचे फड जमताना दिसतात. नाट्यसंमेलने, पुरस्कार वितरण समारंभ, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, चित्रपट इत्यादीमधून  प्रेक्षक तमाशाचा आस्वाद घेताना दिसतात. आज विद्यापीठातूनही तमाशा हा लोकप्रकार अभ्यासला जातो.
         महाराष्ट्राला जी शाहिरी परंपरा लाभलेली आहे ते शाहिरी वाड्मय तमाशाच्या निमित्तनेच निर्माण झाले. लोकमान्य टिळकांनी राजकिय प्रचाराचे साधन म्हणून तमाशाचा उपयोग करुन घेतलाआहे. १९४२ च्या स्वातंत्र्यचळवळीत खेडोपाडी पसरलेल्या बहुजन समाजात राजकीय जागृती निर्माण करण्यासाठीही तमाशाचा वापर केला गेला.
   तमाशामध्ये गद्यभाग फार थोडा असतो. आणि बराचभाग पद्यामध्ये असतो.  हा पद्यभाग लावण्यांच्या स्वरुपात असतो. या लावण्यांना 'कडेढोलकीच्या लावण्या' असे म्हणतात. तमाशामध्ये  नायक, नायिका, सोंगाडया, या पात्रांबरोबरच एक तुणतुणेवाला, एक मंजिरिवाला, एक ढोलकीवाला, एक कडेवाला असतो. या सात लोकांच्या सहाय्याने तमशाला रंग भरला जातो.
    तमाशात 'सोंगाड्या'चे स्थान महत्त्वाचे असते. तमाशातील दोन लावण्यांचा संदर्भ दाखवणारे भाषण त्याला करायचे असते. यालाच संपादणी करणे असे म्हणतात. थोडक्यात तमाशामध्ये शाहीर तसेच नृत्यांगना यांच्याइतकेच महत्त्वाचे स्थान सोंगाड्याला असते. आपल्या विनोदाने तो प्रेक्षकांना खळाळून हसायला लावतो. ग्रामीण भाषा, द्वर्थी शब्द यांचा  वापर करून विनोद निर्मिती करण्यात सोंगाड्या पटाईत असतो.
            सोंगाड्या प्रमाणेच पूर्वी तमाशात एक 'नाच्या' असायचा आवाजात गोडवा आणि बायकी हावभाव असणारा लहानपुरुष हे काम करत असे त्यामुळेही प्रक्षकांची करमणूक होत असे.
            तमाशात जस स्त्रीच रूप  घेऊन एखाद पुरुष पात्र 'नाच्या' म्हणून काम करत तसच 'मावशी' या नावाचही एक पुरुष पात्र असत. विनोदनिर्मिती हे याच काम असत. तमाशातील 'गौळण' या प्रकारात मावशी हे प्रौढ पुरुषपात्र असत.
            तमाशात 'लावणी' या प्रकाराला विशेष महत्त्व आहे. या मध्ये  नृत्यांगना पारंपारिक महाराष्ट्रीय वेशभूषेत नृत्य करताना स्वतः गातही असते.आणि आपल्या दिलखेचक अदांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध  करत असते.
           लावणीमधील कवन रचण हे शाहीराच काम. कधी कधी लावणीनुसार शाहीर ढोलकी गळ्यात अडकवून नृत्यांगनेबरोबर नाचतोही. तमशामध्ये केवळ शृंगाराने भरलेली लावणीच सादर केली जाते असे नाही; तर स्वातंत्र्यप्रेमाने  भारलेली कवने, पोवाडे, स्त्रियांची दु:ख, राजकीय सामाजिक स्थिती  यांचेही वर्णन केले जाते. शृंगाररसाबरोबरच भक्तीरस व वीररसालाही तमाशात स्थान दिले जाते.
          तमाशामध्ये पहिले गाणे सादर केले जाते त्याल 'गण' असे म्हणतात. गण व मुजरा झाल्यावर 'गौळण' सादर केली जाते. ही गौळण भक्तीरस प्रधान असते. कृष्णाच्या लीलांच वर्णन त्यात असत.
          गण गौळण झाल्यानंतर तमाशात 'बतावणी' हा एक प्रकार असतो यामध्ये परंपरेने चालत आलेल्या विनोदी कथेच सादरीकरण अतिशयोक्ती किंवा विसंगती स्वरूपात केल जात. उदा. 'गाढवाच लग्न'.
           बतावणी नंतर मध्यंतर होऊन तमाशा च मुख्य अंग म्हणजे वग किंवा आख्यान सुरु होत. तमाशाच्या संविधानकात एखादे कथासूत्र घेऊन लावण्या गुंफल्या जातात त्या संविधानाला वग म्हणतात. तमाशामध्ये कोणता वग सादर होणार यावरून त्याच श्रेष्ठत्व ठरवल जात.