ब्रह्मगुप्त 

इ.स. ५९८ मध्ये ब्रह्मगुप्त जन्माला आले असावेत असे मानले जाते. उत्तर गुजराथेत 'भिनमाळ' या गावी ते जन्मले असे म्हटले जाते. ब्रह्मगुप्ताने एकूण तीन ग्रंथ लिहिले. १) ब्रह्मसिद्धांत उर्फ ब्रह्मस्फुट सिद्धांत २) खंड-खाद्यक ३) उत्तर खंड-खाद्यक.
'ब्रह्मसिद्धान्ता'मध्ये गणित व ज्योतिर्गणित यासाठी लागणार्‍या सर्व विषयांचा अभ्यास आहे. त्यात एकूण १,०८० श्लोकसंख्या आहे. 'खंड-खाद्यक' हा आपला दुसरा ग्रंथ विष्णूगुप्ताने सामान्यतः  इ.स. ६६६ मध्ये लिहिला असे म्हटले जाते. हा ग्रंथ ज्योतिषांना त्यांचे गणित करायला उपयुक्त आहे असे ज्योतिषी मानतात. 'खंड-खाद्यक' हा ग्रंथ अपुरा वाटल्याने ब्रह्मगुप्तांनी 'उत्तर खंड-खाद्यक' हा तिसरा ग्रंथ लिहिला. या दोन्ही ग्रंथात २६५ आर्या व १३ प्रकरणे आहेत. विवाह व जातक यांना अनुकुल असे गणित ब्रह्मगुप्ताचे आहे. त्यांचे ग्रंथ प्रथम सिंधमध्ये पोहोचले. 'सिंदहिंद' या नावाने त्यांचे भाषांतर करण्यात आले.
    ब्रह्मगुप्त विलक्षण बुद्धीचा, गणिती होता. वेगवान रितीने गणित सोडवण्याच्या अनेक पद्धती त्यांनी शोधून काढल्या. वर्ग करण्याचे ब्रह्मगुप्तीय आडाखे आजही आकर्षून घेतात. वर्ग व वर्गमूळ, घन व घनमूळ ही उलटसुलट परिकर्मे आहेत; हे त्यांनी दाखवून दिले. आर्यभटाच्या वर्गमूळ व घनमूळ काढण्याच्या रिती त्यांनी सुटसुटीत करून दिल्यात.
तीन राशी अथवा तीन गोष्टी दिल्या असता चौथी गोष्ट  काढण्याचे गणित म्हणजेच समत्रैराशिक  ही कल्पना ब्रम्हगुप्ताचीच. 'विलोम क्रिये'च्या संदर्भात ब्रह्मगुप्ताचे नाव जास्त घेतले जाते.
  ब्रह्मगुप्ताची भूमितीतील पारंगतता हा कौतुकाचा विषय आहे. भूमितीतील त्रिकोण व चौकोनाविषयीचे  अनेक सिद्धांत त्यांनी दिले. ज्याच्या बाजू पूर्णांक आहेत; असा समद्वीभुज त्रिकोण कसा करावा ते ब्रह्मगुप्ताने दाखवले आहे. तसेच ज्या चौकोनाच्या बाजू व लंब पूर्णांक असतील असे चौकोनही त्यांनी काढून दाखवले.
ब्रह्मगुप्ताने 'कुट्टक' या शब्दाने भारतात बिजगणित  सुरु केले. वर्ग समीकरणे सोडवण्याच्या सोप्या रिती त्यानी दाखविल्या.
गणित, बिजगणित व भूमिती या तीनही क्षेत्रात ब्रह्मगुप्ताची बुद्धी सारखीच चालत होती. त्यांनी ग्रीक ग्रंथांचाही अभ्यास केला असावा. ब्रह्मगुप्ताच्या ग्रंथांची अरबी व फारसी भाषेत भाषांतरे झाली. होती. ज्योतिषशास्त्राचा पाया आर्यभटाने घातला पण त्याची खरी इमारत ब्रह्मगुप्ताने उभारली . एक कल्प म्हणजे ४३२ कोटी वर्षे असे मानून एका कल्पात ग्रहांच्या किती प्रदक्षिणा हेतात, किती मंदोच्चे होतात, किती पात होतात, हे त्याने त्याच्या नवगणिताने मांडून दाखवले होते, वेध घेण्यासाठी त्यांनी स्वतः काही यंत्रेही बनवली होती. ब्रह्मगुप्त खरा कल्पक गणिती होता.