कविसम्राट रविंद्रनाथ टगोर 

गुरुदेव रविंद्रनाथ टागोर आपल्या श्रेष्ठ वाड्मयाने व विश्वभारतीच्या थोर कार्याने अमर झाले आहेत. त्यांनी शेकडो सुंदर पुस्तके लिहिली. वाड्मयाच्या अनेक प्रकारात मौलिक भर घातली. रविंद्रनाथांनी निरनिराळ्या प्रकारची पन्नास नाटके लिहिली. एकापेक्षा एक सरस अशा चौदा कादंबर्‍या लिहिल्या. ते भारतातील सर्वश्रेष्ठ लघुकथा लेखक होते. त्यांच्या गोष्टींचे पाच संग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी विविध विषयावर उत्तम शेकडो निबंध लिहिले. त्यांच्या निबंधांची ४७ पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांनी एकूण ५४ गीत संग्रह व कविता संग्रह रचले. त्यात सुमारे एक हजार कवितांचा व दोन हजार गीतांचा समावेश आहे. 'जन-गण-मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता-' हे आपले राष्ट्रगीत रविंद्रनाथांनीच रचले आहे.
सात-आठ वर्षांचे असतानाच रविंद्रनाथांनी कविता रचण्यास सुरुवात केली. रविंद्रनाथांचा भाचा त्यांच्यापेक्षा पाच सहा वर्षांनी मोठा होता. एके दिवशी त्याने रविंद्रानाथांना चौदा अक्षरी 'पयार' वृत्ताचे नियम शिकवले; व कविता रचण्यास सांगितले. तेंव्हापासून रविंद्रनाथांना काव्य लेखनाची गोडीच लागली. त्यांच्या मोठ्या भावानेही त्यांच्या कविता वाचून त्यांना काव्य लेखनास उत्तेजनदेण्यास सुरुवात केली. शाळेत शिक्षकांना रविंद्रनांथा कविता रचतात हे समजले पणत्यांचा विश्वास बसेना. एकदा शिक्षकांनी त्यांना एका श्लोकाच्या पहिल्या दोन ओळी दिल्या आणि पुढच्या दोन ओळी रचण्यास सांगितले. रविंद्रनाथांनी क्षणभर विचार करून समर्पक अशा दोन ओळी लिहून दिल्या. एकदा त्यांच्या मुख्याध्यापकांनी त्यांना एक विषय देऊन कविता रचण्यास सांगितले. दुसर्‍या दिवशी नरेंद्रनाथांनी इतकी सुंदर कविता लिहून मुख्याध्यापकांना दखवली; की खूष होऊन मुख्याध्यापकांनी वरच्या वर्गातल्या मुलांसमोर रविंद्रनाथांना ती वाचायला सागितली. इतक्या लहान वयात कविता रचणार्‍या रविंद्रानाथांना काव्याची मुळातच आवड होती. अनेक बंगाली काव्ये त्यांनी वचली. लहान मुलांसाठी लिहिलेली पुस्तके तर ते वाचतच पण मोठ्यांसाठी  लिहिलेली नाटके, कादंबर्‍याही ते वाचत. त्यांच्या या वाचनांमुळेच बंगाली भाषेवर त्यांनी प्रभुत्त्व मिळवले होते.
बंगाली भाषेवर प्रभुत्त्व मिळवणार्‍या  रविंद्रनाथांचे इतर विषय कच्चे होते. त्यांना अभ्यासाचा कंटाळा येत असे. त्यांच्या घरी संस्कृत शिकवायला येणार्‍या शिक्षकांनी त्यांची काव्याची आवड लक्षात घेऊन त्यांना व्याकरणाऐवजी संस्कृत काव्य शिकवायला सुरुवात केली. सुप्रसिद्ध संस्कृत कवी कालिदास यांचे 'कुमारसंभव' हे काव्य व 'शाकुंतल' हे नाटक तसेच इंग्रज नाटककार शेक्सपिअर यांचे 'मॅकबेथ' हे नाटक त्यांना बंगालीत अर्थ सांगून शिकवण्यात आले. त्यावेळी अवध्या तेरा वर्षाच्या रविंद्रनाथांनी 'कुमासंभव' व 'मॅकबेथ' यांचे काव्यरुप भाषांतर केले.
वयाच्या तेराव्या वर्षापासून रविंद्रनाथांच्या कविता प्रसिद्ध होऊ लागल्या. 'ज्ञानांकुर' नावाच्या मासिकात त्यांची 'वनफूल' नावाची कविता प्रथम छापून आली. 'तत्त्वबोधिनी पत्रिका' व 'अमृत-बझार पत्रिका' यासारख्या नियतकालिकातही त्यांच्या कविता प्रसिद्ध होत होत्या. पण त्या सुमारास ते 'भनुसिंह' या टोपण नावाने कविता प्रसिद्ध करीत होते.
सन १८७७ साली त्यांच्या ज्योतिरिंद्रदादांनी 'भारती' नावाचे मासिक सुरु केले. त्यात रविंद्रानाथांचे 'कवि-कहिनी' हे काव्य प्रसिद्ध होऊ लागले. व पुढील वर्षी ते काव्य पुस्तक रुपाने प्रसिद्ध करण्यात आले. हेच रविंद्रनाथांचे पहिले छापील पुस्तक.
वयाच्या सतरा-अठराव्या वर्षी ते आपल्या सत्यंद्रनाथ दादा बरोबर विलायतेला गेले. तेथे राहूनही त्यांचे कविता लेखन चालूच होते. "भारती" व इतर मासिकांसाठी ते कविता व निबंध लिहून पाठवत. तेथे त्यांनी अनेक   सुंदर गीते रचली व त्यांना छान चालीही लावल्या. याच काळात त्यांनी 'भग्न हृदय' नावाचे स्वतंत्र  काव्य रचण्यास सुरुवात केली. विलायतेला असताना त्यांनी इंग्रजी वाड्मयाचा अभ्यास केला. आणि कविता, गीते, निबंध याबरोबरच नाटके, लघुकथा, कादंबर्‍याही ते लिहू लागले. 'वाल्मिकी प्रतिभा', 'संध्यासंगीत', प्रभात संगीत' अशी त्यांची अनेक पुस्तके एकामागून एक प्रसिद्ध होऊ लागली.
१८८७ साली माघ महिन्यातील उत्सवात रविंद्रनाथांनी काही रसाळ गीते रचली. आणि आपल्या मधुर आवाजात सुंदर चालीवर म्हणून दखवली. त्यांच्या वडिलांना ती गीते इतकी आवडली की त्यांनी त्यांना पाचशे रुपयांचे बक्षीस दिले. लेखनाबद्दल रविंद्रनाथांना मिळालेले हे पहिलेच पारितोषिक होते.  त्यानंतर रविंद्रनाथांनी वाड्मय सेवा हेच आपले ध्येय ठरविले. आणि एकापेक्षा एक सरस कविता ते लिहू लागले.
             ठाकूर कुटंबाची बहुतेक जमिनदारी बंगालच्या पूर्व भागात होती. हा प्रदेश म्हणजे लहान मोठ्या नद्यांच रमणीय स्थान. जमिनदारीची व्यवस्था पहाण्यासाठी ते या नद्यांतून प्रवास करीत. नदीकाठचा निसर्गरमणीय प्रदेश पाहून त्यांना काव्यलेखनाची स्फूर्ती येई. याच काळात त्यांनी 'सोनार तरी', 'चित्रा' या कविता संग्रहातील उत्तमोत्तम कविता रचल्या. उत्तम नाटक , लघुकथा व कादंबर्‍या लिहिल्या.
             गुरुदेव रविंद्रनाथांचा सर्वश्रेष्ठ काव्यसंग्रह म्हणजे 'गीतांजलि'. सन १९०६ ते १९१० या चार वर्षाच्या काळात लिहिलेल्या १५७ भक्तीपर गीतांचा तो संग्रह आहे. साध्या सोप्या रसाळ भाषेत सुंदर व उदात्त विचार या गीतांच्या ओळीत वाचायला मिळतात. त्यातील अनेक गीतांना रविंद्रनाथांनी स्वतः सुंदर चाली लावल्या. सन १९१० मध्ये "गीतांजली" प्रसिद्ध झाली.
      सन १९१२ मध्ये रविंद्रनाथ विलायतेला गेले असताना तेथील कविमित्रांसाठी रविंद्रनाथांनी "गीतांजली"," रवेया", "नैवद्य" वगैरे काव्यसंग्रहातील काही गीतांचे इंग्रजीत भाषांतर केले. तेथील अनेक कवी, लेखक, टीकाकार यांच्या सभेपुढे त्या भाषांतराचे वाचन झाले. आणि त्यानंतर रविंद्रनाथ विलायतेला एक थोर कवी म्हणून प्रसिद्धीस आले. 'इंडिया सोसायटी' नावाच्या संस्थेने त्यांच्या सुंदर इंग्रजी गीतांचे एक पुस्तक छापले. या इंग्रजी "गीतांजलीत" एकूण १०३ गीते आहेत. त्यातील ५१ गीते बंगाली "गीतांजली" मधून तर बाकीची गीते 'नैवेद्य', 'गीतिमाल्य', 'रवेया' वगैरे कविता संग्रहातून घेतलेली आहेत. त्या पुस्तकाच्या अनेक प्रती खपल्या. अनेक आवृत्त्या निघाल्या. आणि रविंद्रनाथांच्या इतर काही पुस्तकांची भाषांतरेही प्रसिद्ध झाली.
   सन १९१३ साली रविंद्रनाथांना एक श्रेष्ठ कवी म्हणून वाड्मयाचे 'नोबेल पारितोषिक' जाहीर करण्यात आले. आणि रविंद्रनाथांचे नाव जगभर प्रसिद्ध झाले. जगातील श्रेष्ठ कवींमध्ये त्यांचे नाव झळकू लागले. नोबेल पारितोषिक मिळवणारे भारतातील नव्हे तर आशिया खंडातील रविंद्रानाथ  हे पहिले साहित्यिक ठरले. त्यांच्या 'गीतांजली' मुळे भारताच्या वाड्मयाला जगाच्या आधुनिक वाड्मयात मानाच स्थान मिळाले.
  जगप्रसिद्ध नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतर डाक्का व कलकत्ता येथील विश्वविद्यालयांनी त्यांना 'डॉक्टरेट इन लिटरेचर' किंवा 'साहित्याचार्य' ही बहुमानाची पदवी दिली. इंग्लंडच्या राजाने आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांना 'सर' हा किताब दिला. 'आशियाचे कविसम्राट' असा त्यांचा गौरव करण्यात आला.