मराठी नाट्यसृष्टीचा धावता आढावा 

नाटक हे मानवी संसाराचे चित्रच असते. मनुष्यावर येणार्‍या नानाविध प्रसंगाचे, मनोवृत्तींचे वर्णन नाटकात केलेले असते. त्यामुळे सामाजिक जीवनावर परिणाम घडवून  आणण्याच्या दृष्टीने सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला म्हणजे नाट्यकला. सृष्टीनिरीक्षण, कल्पना शक्तीचा विकास, मानवस्वभाव परीक्षण यांचा अभ्यास नाटकातून केलेला आढळतो. भाषा, वक्तृत्त्व, अभिनय, नृत्य, चित्र, शिल्प, काव्य, संगीत या सार्‍या कलांचा विकास घडवून आणण्याचे सामर्थ्य नाट्यकलेमध्येच आहे. अनुकरण, आत्मप्रकटीकरणाचाही भाग त्यात असतो. "जीवनाचा जिवंत आदर्श आपल्या स्वतःच्या चरित्राने  समाजापुढे मांडणार्‍या विभूतींचा अपवाद वगळता नाट्यकलेइतके जनमनाची पकड घेणारे दुसरे समर्थ तंत्र आढळत नाही" असे बर्नार्ड शॉ यांनी म्हटले आहे. "नाट्यम भिन्नरुचैर्जनस्य बहुधाप्येक समाराधनम |" असे कालिदासानेही म्हटले आहे. अर्थात नाटक हे केवळ करमणूकीसाठी नसावे त्यातून समाजप्रबोधन व्हावे.
नाट्यकलेला फार जुनी परंपरा आहे. मराठीतील सर्वात जुने उपलब्ध नाटक व्यंकोजीसुत शाहुराजे यांनी सुमारे १६८२ च्या सुमाराला रचले 'लक्ष्मीनारायण कल्याण' असे त्याचे नाव होते. सुप्रसिद्ध इतिहासकार वि.का. राजवाडे यांना तंजावर येथील रामदासी मठात ते सापडले. पण त्याहीपूर्वी तुकाराम, ज्ञानेश्वर, रामदास इत्यादी संतांच्या काव्यात नाटकांचा उल्लेख आढळतो. पण त्या नाट्यांना आजच्या सारखे प्रगत रुप नव्हते. कळसूत्री बाहुल्या, दशावतार, बहुरुपी, भारुड, गोपाळकाला, गोंधळ, लळीत, तमाशा, प्रहसन हे नाट्यप्रकार त्याकाळात प्रचलित होते. आणि हेच आजच्या नाट्यसृष्टीच्या पायाचे खंदक म्हणायला पाहिजेत.
नाट्यसृष्टी अशा विविध नाट्यप्रकारात गुंतत चालली असताना तिला निश्चित व निर्णायक स्वरूपाचे वळण लावण्याचे कार्य १८४२ मध्ये सांगलीच्या विष्णूदास भावे यांनी केले. सन १८४३ मध्ये 'सीतास्वयंवर' नावाचे पहिले नाटक रंगभूमीवर सादर झाले. आणि त्यांना मिळालेले अपूर्व यश पाहून अनेक नाटक कंपन्या अस्तित्त्वात आल्या. या नाटकांची ठराविक पद्धत होती. सुरवातीला सुत्रधाराचे परमेश्वराची स्तुती करणारे मंगलाचरण, मग विदूषक व सूत्रधार यांच्यातील विनोदपर संवादातून  नाटकाचा विषय सूचित केला जाई. मग गजानन महाराजांचे स्तवन. नंतर ब्रह्मकुमारी सरस्वतीचे स्तवन करून नाटकाला प्रारंभ होई. ही नाटके बरीचशी पौराणिक असत. त्यातील संवाद कधी लिहिलेले तर कधी आयत्यावेळी तयार केलेले असत. त्यामुळे या नटकात सूत्रधार व विदुषक यांना प्रथमपासून शेवटपर्यंत अनेक कामे करावी लागत.
 त्यानंतर आली ती "बुकीश नाटके". त्यामध्ये इंग्रजी व संस्कृत नाटकांचे मराठी भाषांतरे करून ती रंगभुमीवर सादर केली जाऊ लागली. आता पूर्वीच्या पौराणिक नाटकांपेक्षा यांचा बाज वेगळा होता. रंगभूमीवरील पडदे, देखावे, पोशाख वगैरे बाबतीत बराच बदल झाला. वेणीसंहार, शाकुंतल, मुद्राराक्षस, मृच्छकटिक अशा संस्कृत नाट़कांची व इंग्रजीतील शेक्सपिअरच्या नाटकांची ही भाषांतरे होती.
    यानंतर आली ती "संगीत नाटके". १८ नोव्हेंबर १८८२ रोजी अण्णा कोर्लोस्करांच्या "सौभद्र" नाटकाचा पहिला प्रयोग पुण्याला किर्लोस्कर नाटक मंडळींनी केला. 'संगीत रामराज्यवियोग', 'संगीत शाकुंतल' ही याच पठडीतील अन्य नाटके. पुढे सौभद्रच्या कथानकावर आधारीत 'सुभद्राहरण' ,'त्रिदंडीसंन्यास', 'संन्यासाचे लग्न' ही नाटके लिहिली गेली. स्वकपोलकल्पित कथा, साधी सोपी रसाळ भाषा, पदांच्या उत्कृष्ट चाली ही वैशिष्ट्ये त्यात होती.
  त्यानंतर आली ती सामाजिक नाटके. पूर्वीच्या प्रहसन किंवा फार्स या प्रकारातून त्याची निर्मिती झाली. सामाजिक प्रश्न स्वतंत्र नाटकाद्वारे, गंभीरपणे लोकांना पटतील अशा पध्दतीने मांडले जाऊ लागले. सन १८५९ मध्ये गो. ना. माडगावकरकृत 'व्यवहारोपयोगी नाटक'  या नावाचे पहिले सामाजिक नाटक सादर केले गेले. गो,ब. देवल यांचे गाजलेले नाटक 'संगीत शारदा', कोल्हटकरांचे 'वीरतनय' ही याप्रकारची नाटके. त्याशिवाय इंग्रजीतून रुपांतरीत केलेली "संशयकल्लोळ", "झुंझारराव", संस्कृतमधील रुपांतरीत झालेली "मृच्छकटिक", "विक्रमोर्वशीय", "शापसंभ्रम" ही नाटकेही खूप गाजली.  
 पौराणिक व सामाजिक नाटकांबरोबर कपोलकल्पित कथानकांवर आधारीत नाटकेही रंगभूमीवर सादर केली जात होती. ती चमत्कृतीपूर्ण कथानकावर आधारलेली अदभूत रम्य असत. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी त्यात विधायक स्वरुपाचा बदल केला त्यांनी त्यात मार्मिक व चुरचुरीत संवाद, शब्दनिष्ठ विनोद, चटकदार चाली व काव्यमय कल्पना असलेली पदे यांची जोड दिली. शिवाय सूत्रधार, नटी यांचा प्रवेश अजिबात काढून टाकला.
  मराठी रंगभूमीच्या १८४३ ते १९०० च्या करकीर्दीत मुख्यत्वे पौराणिक, अदभूत, सामाजिक कथानके असलेली नाटके होत असत. १९ व्या शतकाच्या प्रारंभापासून देशातील राजकीय आंदोलने जसजशी वाढली तशी राजकीय तत्त्वज्ञानाची बैठक व प्रचाराची भूमिका असलेली नाटके येऊ लागली. नवी कथानके, कपोलकल्पित गोष्टींबरोबरच पौराणिक कथानकामागे राजकीय रुपक अभिप्रेत धरून नाटके लिहिली जाऊ लागली. 'किचकवध', 'भाऊबंदकी' ही त्यांतील गाजलेली नाटके.
 पौराणिक व सामाजिक नाटकांना साधणारा दुवा म्हणजे म्हणजे ऐतिहासिक नाटके १८६१ मधील वि.ज.कीर्तने यांचे 'थोरले माधवराव पेशवे' हे मराठीतील पहिले स्वतंत्र ऐतिहासिक नाटक. खाडीलकरांचे
'भाऊबंदकी', गडकर्‍यांचे 'राजसंन्यास', न.चि. केळकरांचे 'तोतयाचे बंड' ही त्यातील काही नाटके खूप गाजली.
किर्लीस्करांच्या नाटकातील घरगुती वळणाचे संवाद, देवलांच्या नाटकांतील भावनोत्कटता व भाषेतील जिव्हाळा, कोल्हटकरांच्या नाटकांतील स्वतंत्र विनोदी उपकथानके योजण्याची कल्पना व कोटीबाज संवाद, खडिलकरांच्या नाट्यघटनांतील भव्यता अशा अनेक नाट्यगुणांचे संकलन करून  राम गणेश गडकर्‍यांनी नाट्यलेखन करायला सुरुवात केली. दारुच्या दुष्परिणामावर आधारलेले त्यांचे 'एकच प्याला' नाटक खूप गाजले. 'प्रेमसंन्यास', 'भावबंधन' , 'पुण्यप्रभाव' ही त्यांची गाजलेली नाटके होती. याच स्वातंत्र्य पूर्व काळात समाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रात वेळोवेळी होणार्‍या प्रश्नांवर ताबडतोब लोकांना आवडतील अशा थाटाची नाटके भा.वि. वरेकर यांनी लिहिली. समाजातील मध्यम वर्गाला गृहित धरून ही नाटके लिहिली गेली. माधव नारायण जोशी यांनीही सन १९१० ते सन १९४६ या काळात एकूण २५  नाटके लिहिली. त्यांच्या बहुतांशी नाटकांतून प्रचलित समाजातील दोष त्यांनी विडंबन रुपात मांडले. त्यांच्या नाटकातील पात्रे व विडंबनात्मक भाषा यामुळे त्यांच्या नाटकांनी प्रेक्षकांना खूप हसविले.
    १९३० च्या सुमारास नाट्यकलेला उतरती कळा लागली. तेंव्हा मराठी रंगभूमीला पुन्हा वैभवशाली बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू झाले. १९३३ मध्ये 'नाट्यमन्वंतर' ही संस्था स्थापन झाली. या संस्थेने नाटकांमध्ये काही सुधारणा घडवून आणल्या. स्वगत भाषणांना फाटा देण्यात आला रंगमंच्यावर खरोखरची दारे, खिडक्या, भिंती दाखवणार्‍या सीन्सची योजना करण्यात येऊ लागली. स्थलविशेष दाखवण्यासाठी पडद्यांची उणीव भासू नये म्हणून अंक एक प्रवेशी केले गेले. आवश्यक तेथेच मर्यादित संगीत ठेवले. संगीताचे साथीदार पडद्याआड बसू लागले. आणि जरुर तेथे पार्श्वसंगीत योजण्यात येऊ लागले.
  प्रेक्षकांचे लक्ष परत रंगभूमीकडे वळण्याच्या कामी नाट्यमन्वंतर संस्थेप्रमाणेच प्र. के. अत्रे यांनीही प्रयत्न केले. जवळजवळ एक तप मराठी रंगभूमी त्यांनी गाजवली. सन १९२६ ते १९४५ या काळात त्यांनी अनेक विनोदी नाटके तर लिहिलीच पण त्याचबरोबर गंभीर, भावपूर्ण, प्रचारकी स्वरुपाची नाटकेही त्यांनी लिहिली.
पुढे बोलपटांचा काळ आला आणि नाट्यसृष्टीला बोलपटांशी स्पर्धा करणे अटळ झाले. नाटकाचा कालावधी, भाषा, प्रयोग या सर्वच बाबतीत सुधारणा करणे गरजेचे झाले. मग १९४१ मध्ये ' 'नाटयनिकेतन' ही संस्था मोतीराम रांगणेकर यांनी १९४१ मध्ये काढली. आता नाटक तीन तासाचे झाले. पाल्हाळीक संवाद जाऊन आटोपशीर व चित्तवेधक संवादांनी त्यांची जागा घेतली. कथानकाला वेग देणारी व प्रेक्षकांच्या मनाचा वेध घेणारी साधी सुटसुटीत वाक्ये त्यात आली. नाटक लिहिण्याचे नसून पहायचे आहे; या दृष्टीने ते आकर्षक बनवले जाऊ लागले. आकर्षक कथानक, गतिमान, व मार्मिक संवाद, अकृत्रिम विनोद, आकर्षक व आटोपशीर सजावट यांनी नाट्यसृष्टी पुरती बदलून गेली.