जादू- एक कला 

कोणी आपली फसवणूक केली तर आपण चिडतो, रागवतो. प्रसंगी मारामारी करण्यासही तयार होतो.पण जादूच्या बाबतीत मात्र तस होत नाही. खर तर जादू म्हणजे फसवणूक, हातचलाखी. पण आपणा सर्वांना ही फसवणूक हवी हवीशी वाटते. जादूतून केलेल्या फसवणूकीचा आपण मनसोक्त आनंद घेतो. आपली दु:खे, नैराश्य आपल्या काळज्या सार विसरायला लावण्याच जादू हे एक मनोरंजनाच साधन आहे. जादू ही एक कला आहे. खूप अभ्यासानी,  प्रयत्नांनी ती साध्य होते. सततचा सराव, चिकाटी, मेहनत, नाविन्याचा ध्यास आणि जबरदस्त आत्मविश्वास यातून उत्कृष्ट जादूगार निर्माण होतो. चलाख, हुशार आणि व्यासंगी जादूगार आपल्या हस्तकौशल्याने लोकांना मंत्रमुग्ध करतो.
जादू हा शब्द संस्कृत भाषेतील 'यातू' या शब्दापासून बनला आहे. 'असंभव गोष्टीला संभव बनवणारी शक्ती' असा त्याचा अर्थ आहे. हातचलाखी, यांत्रिक कौशल्य, विज्ञानातील प्रयोग यांचा उपयोग करून असंभव गोष्टी जादूच्या माध्यमातून शक्य करुन  दाखवल्या जातात. त्यामुळे कोणताही हुशार माणूस जादुकला शिकू शकतो. त्यामध्ये दैवी सामर्थ्य, मंत्रशक्ती असले काही प्रकार नसतात. म्हणूनच इंग्रजीमध्ये जादूला 'मॅजिक' असा शब्द आहे. 'बुद्धिमान माणूस' या अर्थाच्या लॅटिन भाषेतील मॅजि या शब्दापासून तो तयार झाला आहे.
जादू शिकायची म्हणजे  अनेक युक्त्या शिकायच्या. मग ती पत्त्याची जादू असो; वा स्पंजच्या तुकड्यातून ससा निर्माण करण्याची  जादू असो, किंवा रिकाम्या टोपीतून कबूतर बाहेर काढायचे असो;  की  १० रु  च्या  नोटेचे रुपांतर हजार रुपयांच्या नोटेत करायचे असो; सार्‍याचवेळी काही युक्त्याच तर वापारलेल्या असतात. पेटीत मुलीला बसवून तिला अदृश्य करणे किंवा  बांधलेल्या दोरीतून सुटका करुन घेणे, मुलीला अधांतरी झोपवणे, एखाद्याच मुंडक उडवून ते पुन्हा जोडणे अशा अनेक जादुंमध्ये साहित्याची कामाल असते. विविध खटके, यांत्रिक कौशल्य वापरुन ही साधने बनवलेली असतात. ती साधने वापरायच  कौशल्य शिकून घेणे म्हणजे जादू शिकणे. काही वेळा सोपे शास्त्रीय प्रयोग व रसायनांच्या करामती करुनही जादू केली जाते.
आणि म्हणून ज्याला जादू शिकायची आहे. त्याची निरिक्षणक्षमता व ग्रहणक्षमता जबरदस्त हवी. तसेच आत्मविश्वासाबरोबर सभाधीटपणा, हजरजबाबीपणा, समयसूचकता हवी. चेहरा प्रसन्न व बोलका हवा. लोकांच्या मनाची पकड घेऊ शकेल असे बोलणे हवे. प्रबळ इच्छाशक्ती बरोबर अथक परिश्रमाची तयारी हवी. नवनवीन कल्पना अजमावून पहाण्याइतपत विज्ञानाचा, मानशास्त्राचा, समाजशास्त्राचा अभ्यास हवा, व्यासंग हवा, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्याला जादू शिकायची तो नकारात्मक विचारसरणीचा असू नये. मी या प्रयोगात यशस्वी होणारच अशी होकारात्मक भूमिका घेऊनच जादूचे प्रयोग करता आले पाहिजेत. नैराश्य, भित्रेपणा या गोष्टींना येथे थारा नाही. अत्यंत चपळाईने, आत्मविश्वासाने आपल्या जादूचे सादरीकरण करता येणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी वक्तृत्त्वकलेत पारंगतता हवी. अभिनयाचे अंग हवे. बोलण्यात  विनोदशैलीबरोबरच थोडे गांभिर्यही हवे. व्यक्तिमत्त्व आकर्षक हवे. भषेवर प्रभूत्व हवे. थोडक्यात सांगायचे तर जादूचे प्रयोग रंगमंचावर सादर करायचे असोत की काही ग्रुपला जवळून दखवायचे असोत त्यातील गुपिते लोकांना समजणार नाहीत असे वर्तन जादुगाराचे असले पाहिजे. कारण बरच वेळा प्रेक्षकांचा कल जादूचे गुपित शोधण्याकडेच असतो. जादुची गुपिते हाच लोकांचा कुतुहलाचा विषय असतो. ती लपवणे यातच जादुगाराची खरी कसोटी असते. सारंश प्रसंगावधान, समयसुचकता, एकाग्रता,हजरजबाबीपणा, जिज्ञासूपणा, स्मरणक्षमता,निरीक्षणक्षमता,ग्रहणक्षमता आदि अनेक गुणांचा संगम ज्याच्याकडे असेल तो
जादूगार होऊ शकेल.
बरेच वेळा  हौस म्हणून, छंद म्हणून  जादू शिकली जाते पण या छंदाचा योग्य वापर केल्यास पैसा  व  मानसन्मानही मिळवता येतात. जादूकलेचा उपयोग नाटक, सिनेमा, या क्षेत्रातही केलेला आढळतो. जादूकलेचे वर्ग घेऊनही या कलेपासून पैसा मिळवता येतो. अंधश्रद्धा निर्मुलन, व्यसनमुक्ती, शिक्षणक्षेत्र, समाजप्रबोधन अशा अनेक कारणांसाठी जादूकलेचा वापर करता येऊ शकतो. फक्त कल्पकता हवी. अनेक जादूगारांनी आपली जादूविषयक पुस्तकेही प्रसिद्ध केली आहेत. जादू साहित्याची निर्मिती व विक्री हाही एक व्यवसाय होऊ शकतो.