ड्रीम प्रोजेक्ट 

"बाबा आज मला कोण भेटल होत सांगा!" असे ओरडत मुलगा ऑफिसातून घरी आला. मला काही केल्या
त्याचे उत्तर देता येईना. शेवटी तोच म्हणाला, "बाबा तुम्ही नाहीच ओळखणार. नका प्रयत्न करु. अहो! मला ओरिगामी काका भेटले होते. गेल्या  महिन्यात गणेश कॉलनीत रहायला आले आहेत. तुम्हाला बोलावल आहे. मी घाईत होतो जास्त बोलता नाही आल हे कार्ड त्यांनी दिल आहे."
हे ओरिगामी काका म्हणजे नारायण पाटील. मुल लहान असताना आमच्या बाजुच्या ब्लॉकमध्ये भाड्याने रहायचा. त्यावेळी तो स्वतः ओरिगामी शिकायचा आणि आजुबाजुच्या मुलांना शिकवयचा  कागद घेऊन कायम घड्या घालण्यात गर्क असायचा. पण मुलांमध्ये भारी प्रिय होता. मोठा छांदिष्ट मुलगा होता. वर्षभरात त्याला नोकरी लागली. आईवडील गावाला गेले आणि हा नोकरीच्या ठिकाणी. त्यानंतर त्याचा संपर्क नव्हता. लग्नाची पत्रिका आली होती पण आम्हाला जाणे काही शक्य झाले नव्हते. मग या रविवरी आम्ही तिघांनीही त्याला भेटायला जायचे ठरवले.
माझा मुलगा खूप उत्साहात होता. त्यानेच फोन करून आम्ही येत असल्याचे कळवले. आणि आम्ही रविवरी ओरिगामी काका उर्फ नारायण पाटील कडे पोहोचलो. त्याच्या 'ओरिगामी' नावाच्या बंगल्यात पती पत्नीने आमचे छान स्वागत केले. हॉलच्या अख्या एका मोठ्या भिंतीवर एक भलीमोठी फ्रेम लावली होती त्यात ओरिगामीच्या कितीतरी कलाकृती आकर्षक पद्धतीने मांडल्या होत्या. मुलगा त्याकडे वळला औपचारिक गप्पांनंतर  त्याची पत्नी चहाची व्यवस्था करायला घरात गेली. आणिआम्हा तिघांचा गप्पांचा फड जमला.
नारायण व त्याची पात्नी एका नामांकित कंपनीत मोठ्या हुद्द्यांवर नोकरीला होते. दोन्ही मुलगे अमेरीकेला शिक्षणाला गेले होते. नारायण म्हणाला, "तुमच्या तिथून निघाल्यानंतर आई बाबा गावीच राहिले आहेत. मी नोकरी निमित्त अनेक गाव फिरलो जिथे जाईन तेथे ओरिगामीचे क्लास घेतले. नवीन नवीन खूप प्रकारही मी शोधून काढले नयना माझी बायको आणि दोन्ही मुलांनाही या ओरिगामीचा छंद लागला झपाटल्या सारख आम्ही या छंदात पुरते अडकलो. गावाला काही होतकरु तरुण मिळाले. त्यांना ही कला शिकवली. आता गावच्या घरी ती मुल क्लासेस घेतात. आई बाबांनाही सोबत होते. या ओरिगामीने आम्ही खूप माणस जोडली. पैसा मिळवला मग घराला पण नाव दिल "ओरिगामी."
तेवढयात आतून नयनाने विचारले "अहो त्यांना करवंटया दाखवल्यात कां?" ही काय आणखी भानगड म्हणून आश्चर्य व्यक्त करायच्या आधीच नारायण आम्हाला एका खोलीत घेऊन गेला तेथे कपाटभर करवंट्यांच्या वस्तूच वस्तू. छान कोरिवकाम केलेल्या आणि पॉलिशमुळे चमक आलेल्या त्या विविध वस्तू आणि कलाकृती करवंटयांच्या आहेत हे खरच वाटत नव्हत. विस्फारलेले डोळे तसेच ठेऊन मी म्हटले "अरे नारायण, हे सगळ तू केलस !" नारायण म्हणाला," नाही. आम्ही चौघांनी. मी प्रथम शिकलो. मग या तिघांना शिकवल." "अरे पण करता कधी हे उद्योग?" मी विचारल. तर म्हणाला काही नाही रिकामा वेळ मिळाला की चौघ एकत्र बसायचो आणि जमवलेल्या करवंटीला हवा तो आकार द्यायचा. छान चित्र कोरायच. मस्त वेळ जायचा. मुळात चौघ एकत्र काम करत असल्याने आमच्या चौघत छान जवळीक निर्माण झाली होती. कधी मुलांचे मित्र, कधी हिच्या मैत्रीणी यायच्या त्यांनाही शिकवायचो. गप्पा मारत छान वस्तू बनायच्या.
"मग आता नवीन काय?"  नारायणच्या डोळ्यात पाणी आल. म्हणाला, " काका आता सध्यातरी काही नाही."  "का रे?"  अहो आमच्या चौकटीच्या दोन काड्या कधीच बाहेर उडाल्या. त्यांच्या शिवाय नाही मन रमत कशात."
"हँ ! तू म्हणजे कमालच आहेस. उलट आता भरपूर वेळ आहे. पैसा आहे. जबाबादार्‍या पण संपल्या. आता जोमाने नवीन काही करण्याचे दिवस आलेत तुमचे. आणि तुम्ही रडत काय बसलात ? आणि मुलांना अमेरिकेला पाठवायचच तुमच स्वप्न होत नां ! मग रे!" "तिथेच तर गोम आहे काका ! अस बघा, मला लहानपणापासूनच ओरिगामीमध्ये काहीतरी भव्य दिव्य करायच होत.नोकरी करणे आवश्यकच होते. मग ती करता करता मी ओरिगामी शिकलो. इतरांना शिकवल. प्रदर्शन भरवली. स्पर्धा जिंकल्या. सगळ मनासारख झाल. माझ स्वप्न पूर्ण झाल. नयनाला शिल्पकलेत काही करायच होत. पण तिला शिकायला वेळ नव्हता. मग मी शिकलो. तिला शिकवल.  आम्ही सर्वांनीच तिला मदत करून छान वस्तू बनवल्या,त्यांचीही छोटी छोटी  प्रदर्शन भरवली. तिच छोट स्वप्न पूर्ण झाल. मग दोघां पुत्रांना अमेरिकेला पाठवायचं स्वप्न बघितल. त्यसाठी धावपळ , धडपड केली, तेही स्वप्न पूर्ण  झाल. बर्‍याच वर्षानी  रिकामपण मिळाल. तेंव्हा वाटू लागल, फार घाई झाली. स्वप्न पूर्ण झालेली बघण्यापेक्षा ती अपूर्ण असतात. तेंव्हाच खरी गम्मत असते. त्याबद्दल बोलायच, मनोरथ रचायची, कल्पना मनातच अजमावून पहायच्या, जमवाजमव करायची, पळापळ करायची, अपयश झेलायची या सार्‍यात जी मजा आहे ना ती स्वप्नांच्या पूर्ततेत नाही. एकदा का स्वप्न पूर्ण झाली की सार ठप्प! म्हणून ठरवलय गावाला घर बांधण्याच स्वप्न बघायच. पण ते पूर्ण करण्यासाठी फार धावपळ करायची नाही. रिकामा वेळ
मिळाला कि आम्ही दोघ बसतो. गावच घर, त्याभोवतीची बाग याविषयी खूप बोलतो. रोज नवनवीन कल्पना शोधतो. आणि डोळ्यासमोर चित्र उभ करतो आमच्या या ड्रीम प्रोजेक्टच. ते पूर्ण करूच अस नाही. पण त्याविषयी स्वप्न मात्र बघायची. छान वेळ जातो.
"अहो आपल्या ड्रीम प्रोजेक्ट बद्दल बोललात का?" असे म्हणत नयना बाहेर आली. घरी निघायच्या तयारित असलेले आम्ही तिघ पुन्हा खाली बसलो.आणि खरच त्यांच्या त्या ड्रीम प्रोजेक्टबद्दल बोलताना एक तास कसा गेला हे कळलच नाही.
असेच मधून मधून आम्ही भेटत होतो.विषय नेहमीचाच " ड्रीम प्रोजेक्ट". अशीच चारपाच वर्ष  गेली .एके दिवशी सकाळच नारायणचा फोन आला," काका गावाला येता का आमच्याबरोबर?" नारायण विचारत होता. "का रे?" मी विचारले."अहो, घर बांधायला घेतोय." नारायण म्हणाला. अरे पण ते तुमच ते " ड्रीम प्रोजेक्ट" आहे ना? " मी बुचकळ्यात पडून विचारले. नारायण उत्साह भरल्या आवाजात म्हणाला," काका चौकडीच्या दोन काड्या परत येताहेत. आता आमच" ड्रीम प्रोजेक्ट" पूर्ण होणार. आणि मुलांच स्वतंत्र व्यवसाय करायच स्वप्न हे आमच" ड्रीम प्रोजेक्ट" बनणार
एका वर्षातच नारायणने आपले गावचे घर बंधून पूर्ण केले आणि आम्ही नविन स्वप्नांच्या कल्पनात रममाण झालो.