माझी आजी आणि मी 

आहो! आज मी आजी झाले असे  म्हणत मी घरभर फिरले. शेजारीपाजारी  सांगितले. गाववाल्यांशी फोनवर बोलले. परदेशी इमेल्स केले. माझी मुलगी आई झाली. आम्ही आजी आजोबा झालो. केवढा हा आनंदाचा क्षण! या क्षणाला आठवली ती माझी आजी. माझा आदर्श. लहानपणी भातुकलीच्या  खेळात आजीचा रोल नेहमीच माझा असायचा. चंद्रभागा तिचे  नाव. कपाळाला भलमोठ  लालभडक कुंकु, काचेच्या अन सोन्याच्या बांगड्या- पाटल्यांनी दोन्ही हात भरलेले, गळ्यात मंगळसूत्राशिवाय अन्य सोन्याच्या विविध प्रकारच्या माळा, कानात कर्णफूल, भल्यामोठ्या केसांचा घट्ट अंबाडा  त्यावर सदैव फुलांचा गजरा नाहीतर वेणी, चापूनचोपून  नेसलेल नऊवरी लुगडं आणि सदैव कामात दंग. अशी माझी आजी होती. कधी घराबाहेर पडायची नाही. पण कायम अशीच सजलेली गृहलक्ष्मी. मी माझ्या अवताराकडे पाहिले. अंगात सलवार कमीज, एका हातात  एकच आर्टिफिशल बांगडी, दुसर्‍या हातात घड्याळ, कानात आर्टिफिशल खडे, गळ्यात तोटक नाजूकस मंगळसूत्र , केस छाटून क्लीप लावलेली, गजरा घलण्याची सवय नाही. कखोटीला पर्स हातात मोबाइल अशा अवतारात मी बसच्या रांगेत उभी होते. ''अहा रे आजीबाई'' अस म्हणून मी स्वतःशीच खुदकन हसले.
मला आठवतय बेबीमावशीला दिवस गेल्याच समजताच आजीने सार्‍यांकडून कॉटनचे जुने फ्रॉक मागितले होते. त्याचे छान तुकडे कापून आणि स्वतःच्या नऊवारी साड्या वापरुन छान रंगीत विविध डिझाइन्सच्या कितीतरी गोधड्या तिने हाती शिवल्या होत्या. मऊसर कापड आणून लंगोट, झबली  शिवून घेतली होती. घरात सगळे म्हणायचे, "बेबीमावशीच पोट वाढतय तस आजीच बाळाच्या सामानाच गाठोड पण वाढतय." आणि मी! आत्ता आजी झाले आणि निघाले बाजारात तयार आयत्या रजया, झबली आणि हगीजचे बॉक्स आणायला. काळ किती बदलला.
माझी आजी अनेक गुणांची खाण होती. ठिबके जोडून छान रांगोळ्या काढायची.गोधड्यांची  डिझाइन्स त्यातून ती तयार करायची. दिवाळीच्या सुट्टीत गावी गेलो; की प्रत्येक दिवशी वेगळी रांगोळी तयार करून द्यायची . दुपारी  आईचा आणि तिचा फराळ चाललेला असायचा. आम्ही नातवंड रांगोळीत रंग भरत बसायचो. घरात गडीमाणस, धरुन पंधरावीस माणस रोज असायची. सार्‍यांच  स्वयंपाकपाणी, दुखणीखुपणी, आजारपण, औषध सार्‍यावर ती जातीने लक्ष द्यायची. आता वाटत एवढ मोठ भाताच  पातेल आजी चुलीवरून कशी उतरवत होती? माणस जोडण्याचा तिचा हातखंडा आताच्या एचआरवाल्यांनाही जमायचा नाही. शेतीसाठी, गुराढोरांसाठी, अशा अनेक कामाला वर्षानुवर्ष तीच माणस दिसायची. त्यांच्या घरच्या माणसांची काळजी तीच घ्यायची. तिचा औषधाचा बटवा सदैव तयार असायचा. शिवणटिपण, वीणकाम भरतकाम सार्‍या कला तिला अवगत होत्या. फाटलेला कपडा, तुटलेली बटण दिसली की आजी लगेच सुई दोरा घेऊन शिवून द्यायची. भरतकाम वीणकामाचे कितीतरी नमुने तिने आणि आईने आम्हाला शिकवले होते. आजीला लिहिता येत होते की नाही हे मला माहीती नाही; पण वाचता येत होते. संध्याकाळी नातवंडांबरोबर पाढेही म्हणताना तिला ऐकले होते. श्लोक , प्रार्थना, आरत्या म्हटल्याशिवाय जेवायला बसलेले  कधी आठवत नाही. तिने सांगितलेल्या अनेक कथा आजही आठवतात.व्रतवैकल्ये, सण समारंभ अगदी शास्त्रीय पद्धतीनेच झाली पाहिजेत असा तिचा कटाक्ष असे. आजीच कौतुक कराव तेवढ थोडच.
   मला एवढच सांगायच आहे आजी फारतर चार इयत्ता शिकली होती पण तिला अनेक गोष्टी करता येत होत्या. अगदी प्राथमिक औषधोपचारही ती आत्मविश्वासाने  करत होती. ती स्वतः जास्त शिकली नव्हती; तरी आपल्याला जेजे येत होत ते तिने आपल्या मुलींनाच नव्हे तर इतर अन्य जणींनाही शिकवल होत. दुपारचा रिकामा वेळ हा असल्या छंदांसाठीच असायचा. अनेकजणी एकत्र बसून
काहीनाकाही तरी करत असायच्या.त्यात पापडकुरडुयांबरोब रंगोळ्या मेंद्या औषधोपचार आदि अनेक गोष्टींचा समावेश असे.  आणि मी? पोस्ट ग्रॅज्युएशन करुनही वयाच्या पंन्नास पंचावन्न वर्षापर्यंत फक्त शिकतच राहिले. शिकवण बाजुलाच राहील. सुरवातीला ऑफीस कामांबाबतचे कोर्स झाले. मग टेबल बदलल म्हणून, मग बदली झाली म्हणून, मग बढती मिळली म्हणून, आणि मग कंप्युटर आले म्हणून. बर शिकले काय? तर रकाने भरा. कधी उभे, कधी आडवे, कधी कमी, कधी जास्त, कधी पत्र लिहा, तर कधी पत्रांना उत्तर द्या. बस्स इतकच. मी अगतिकतेने शिकतेय आणि मुलगी करियरच्या मागे धावतेय असच चित्र आता आतापर्यंत होत. आजीने आईला शिकवलेल ज्ञान, रितीरिवाज, परंपराच काय पण  शांतपणे बसून स्वतःच्या मुलीला आजीसारखी  गोष्ट सांगायला सुद्धा मला कधी जमल नाही. यासारख दुर्दैव ते कोणत?  आजीकडून आईकडे आणि आईकडून माझ्याकडे आलेला मागील वंशपरंपरागत अनेक कलांचा वारसा माझ्या पर्यंत आला आणि खंडित झाला. पुढील पिढीला तो देण्यात मी अपयशी ठरले. मी घेतलेल शिक्षण  फक्त रकाने भरण्यापुरतच उपयोगी पडल. त्यासाठी आयुष्याची पन्नास वर्ष खर्च झाली. पैसा मिळाला.पण आजीसारख घर नाही सांभाळता आल. स्त्रीसुलभ अनेक भावभावना, इच्छा सारच कुठच्या कुठे फेकल गेल. सार स्त्रीपणच नष्ट झाल. खरच शिक्षणाने आम्हा स्त्रियांना तारल की मारल ?.