माझ्या मराठी बांधवांनो 

आय बी एन लोकमत चा "आजचा सवाल" नावाचा कार्यक्रम सुरु झाला. "एफ. एम. रेडिओवर मराठी गाणी लावायची सक्ती करायची कां?" असा सवाल होता. गायक कौशल इनामदार यांनी म्हणे याबाबत बाळा साहेब ठाकरे यांचेकडे तक्रार केली आणि बाळासाहेबांनी एफ. एम. ला दम भरला अगदी त्यांच्या ठाकरी भाषेत. आणि म्हणून या संदर्भात आय बी एन लोकमतने वरील प्रश्न विचारला होता. या प्रकाराला हसावं की रडाव तेच समजत नाही.
 माझ्या मराठी बांधवांनो, कां आपल जगात हस करून घेता? ज्या इंग्लंड अमेरिकेचा आदर्श  डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या कपड्यांच, त्यांच्या खाण्यापिण्याच अनुकरण तुम्ही करता त्या इंग्लंड अमेरीकेत मुले पंधरा वर्षाची झाली की; त्यांचे पालक त्यांना स्वतंत्रपणे जगायला सांगतात. स्वतःचे निर्णय घेणे, पैसे कमावणे, चैन करणे या गोष्टी ती मुले स्वत:च्या  हिमतीने करतात आणि आमच्या महाराष्ट्रात जवळजवळ पस्तीशीचे  कौशल इनामदार लहान मुलासारखे तक्रारी करताहेत आणि बाळासाहेब या आपल्या लाडक्या मुलांचे हट्ट पुरवायला दमदाटी करताहेत. हे दृश्यच किती विचित्र आहे?

एफ एम रेडिओला धमकावण्याऐवजी बाळासहेबांनी आपल्या या लाडक्या सुपुत्रांचे  लाड बंद करावेत .
दोन्ही गालफडांवर सणसणीत थोबाडीत आणि कुल्यावर लाथा मारुन कामाला लावावे मुलांचे 'अति लाड' आणि नको इतका अहंगंड मराठी माणसांच्या  आणि महाराष्ट्राच्या विकासातला अडसर बनत चालला आहे. "महाराष्ट्रात भैया लोक आले म्हणून आम्हाला नोकर्‍या नाहीत", "दहावी बारावीच्या इतर बोर्डांच्या  अभ्यासक्रमांमुळे मराठी मुलांना प्रवेशात अडचणी येतात". "थेटरवाले मराठी सिनेमा लावत नाहीत म्हणून मराठी सिनेमा चालत नाहीत", "एफ एम वर मराठी गाणी लावत नाहीत म्हणून मराठी गाणी हिट होत नाहीत". अरे या काय तक्रारी झाल्या?  मराठीच यश कायम दुसर्‍यावरच का बर अवलंबून असाव ? भल्यामोठ्या मुघल सत्तेशी झुंज देऊन केवळ पंधराव्या वर्षी तोरणा सर करून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणार्‍या शिवरायांचे हे असले रडे पुळचट वारस ? शी ?

मराठी तरुणानो, जरा शांतपणे बसून विचार करा. एकाच बाजूने  विचार करुन तुमची डोकी बोथट झाली आहेत, आता जरा दुसर्‍या बाजुनेही विचार करा. म्हणजे अस की माझ सगळच बरोबर आहे.आणि इतर चुकताहेत असे म्हणण्या ऐवजी इतर बरोबर आहेत आपण  कुठेतरी चुकतोय अस मनात गृहीत धरुन विचार करा. आपल्या चुका शोधा. त्या सुधारायचा प्रयत्न करा. इतरांकडे तक्रार करण्यापेक्षा स्वत:च उपाय शोधा. आपल्या फायद्यासाठी इतर लोक तुमचा वापर करताहेत हे लक्षात घ्या. अजुनही वेळ गेलेली नाही "जो दुसर्‍यावर अवलंबला त्याचा कार्यभाग बुडाला" हे नेहमी लक्षात ठेवा.

ग्लोबलायझेशनच्या जमान्यात हे अस माझ माझ करून चालणार नाही. इतरांना आपणात सामावूनच आपल्याला प्रगती करावी लागणार आहे. आमच्यात कोणी यायचे नाही. पण आम्ही मात्र इतरांच्यात घुसणार असे कसे चालेल? इतरांचे चांगले गुण आहेत त्याला दाद द्या. गुणांचा स्वीकार करा. केरळी, गुजराथी, भैया लोक इथ आली म्हणून त्यांचा तिरस्कार करु नका. ती इथ कां आली?  कारण तुम्ही जी काम करायला नकार दिलात ती काम त्यांनी हसत हसत स्वीकारली. आपल्या खिशातल पाकीट चोर पळवून नेतो यामध्ये त्या चोराची हुशारी तर आहेच पण आपला गलथानपणाही त्याला  कारणीभूत आहे हे लक्षात घ्या. तेव्हा परप्रांतीयांचे गुण घ्या. त्यांच्या कसबी शिका मेहनतीला तयार रहा. आपापसात वाद घालण्यापेक्षा अनेकांनी एकत्र येऊन कार्य सुरू करा. एकमेकांचे  पाय ओढण्यापेक्षा एकमेकांना हात दिला तरच मराठीला चांगले दिवस येतील केवळ वाद आणि चर्चा करण्यात बहुमुल्य वेळ वाया न घालवता कामाला लागा.  इतरांच्या हातातील बाहुल बनण्यापेक्षा स्वतःच्या हुशारीने स्वतःच स्थान स्वतःच्याच हिमतीने निर्माण करा. स्वतःच्या क्षमता ओळखा. इतरांशी तुलना टाळा. समाजात ज्या वाईट गोष्टी आहेत त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करा. चांगल्या गोष्टी स्वतःच्या व  इतरांच्या नजरेत रहातील या दृष्टीने प्रयत्न करा. निदान पुढील पिढिला तरी मराठीला उच्च स्थानावर नेण्यात यश येऊ दे अशी परिस्थिती निर्माण करा. थोडक्यात एवढच सांगायच आहे,
                                                                    "आकाशी झेप घेरे पाखरा; सोडी सोन्याचा पिंजरा|
                                                                    तुज पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने ||"