संधी 

एक गाव होत. गावाबाजुला छान नदी होती. गावात नरेंद्र नावाचा एक देवभक्त रहायचा. सतत परमेश्वर चिंतनात मग्न असायचा. परमेश्वरावर अपरंपार श्रद्धा होती त्याची. एक दिवस नदिला महापूर आला. गावात होत नव्हत ते सार वाहून जायला लागल. लोक झाडावर चढून बसली. नरेंद्रही झाडावर चढला. झाडावरील माणसांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी होडया पाठवण्यात आल्या. लोक होडीत बसून जाऊ लागली. नरेंद्र म्हणाल, "मी नाही येणार. माझा परमेश्वर मला वाचवेल". तो त्या झाडावरच बसून राहिला. पुन्हा दुसरी होडी आली शिल्लक राहिलेल्या माणसांना घेऊन गेली. नरेंद्र म्हणाला," मी नाही कुठे येणार परमेश्वर माझ रक्षण करेल". नरेंद्र एकटाच त्या झाडावर राहिला. पुराच्या पाण्या बरोबर झाड उन्मळून पडले. आणि नरेंद्र त्या पाण्यात बुडून मरण पावला. नरेंद्राने परमेश्वराला विचारले," मी तुझा एवढा भक्त, माझा तुझ्यावर इतका विश्वास होता; पण तू काही मला वाचवल नाहीस.  परमेश्वर म्हणाला, "अरे वेडया! मी दोन वेळा होडी घेऊन तुझ्याकडे आलो होतो, पण तूच यायला नकार दिलास. आणि जिवंत राहण्याची संधी गमावून बसलास.. आता मला दोष देऊन काय उपयोग?"
               नरेंद्रला हसण्यात काही अर्थ नाही. आपलही बरेचवेळा असच होत. अनेक संधी दार ठाठोवत असतात. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. त्या मेणाच्या घरात राहणारी चिमणी कशी 'मी माझ्या बाळाला तीट लावले. मी माझ्या बाळाला कपडे करते मग  दार उघडते. "  असे काही तरी कारण सांगत  समोर आलेली संधी गमावून बसतो. एकदा गमावलेली संधी परत मिळण कठीण असत. म्हणून आपण ठरवलेल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करुन ते गाठण्यासाठी समोर आलेल्या अशा त्या संधीचा पुरेपुर लाभ करुन घेतला पाहीजे. संधीच सोन केल पहिजे. संधी मिळाली की त्यासाठी लागणारे परिश्रम करण्याची तयारी मात्र हवी. काय वाटेल ते झाल तरी चालेल पण हाती घेतलेल काम मी पूर्ण करेनच अशी जिद्द हवी. आत्मविश्वास हवा. एकदा त्या क्षेत्रात पाय टाकला की मागे वळून बघायच नाही, माघार घ्यायची नाही, अशी वृत्ती हवी. आयुष्यभर तळ्यात का मळ्यात अस म्हणत स्वीकारलेली धरसोड वृत्ती कधीच यश देणार नाही.

आणि म्हणून आलेली संधी नीट पारखून परिक्षून घ्यायला हवी. आपल्या शारीरिक, मानसिक क्षमता, आपले संस्कार, आपल्यावरील इतर जबाबदार्‍या या सर्वांचा विचार करायला हवा, समर्थ रामदास काय किंवा आर्य चाणक्य काय यांनी राजनीतीचे धडे शिकवले पण ते स्वतः राजे नाही बनले. त्यानी आपल्या क्षमता ओळखल्या होत्या तस आपल्या क्षमता ओळखून मगच आलेली संधी स्वीकारायची की नाही ते ठरवल पाहीजे. अभिनेत्याला नेता बनण्याची किंवा एखाद्या क्रिकेटरला अभिनेता बनण्याची संधी मिळाली तर त्यात तो यशस्वी होईलच असे नाही. केवळ विद्वत्ता आहे म्हणून शिक्षक बनता नाही येत. एखादा उत्कृष्ट लेखक उत्कृष्ट वक्ता होऊ शकेलच अस नाही सांगता येणार.  प्रत्येक क्षेत्राच्या मागण्या वेगवेगळ्या असतात. त्या आपण पुर्‍या करु शकतो कां याचा विचार करायलाच हवा.

          डॉ. आनंदबाई जोशी पहिल्या स्त्री डॉक्टर. त्यांना त्याकाळात शिकण्याची, भारतातच नव्हे तर परदेशात जाऊन शिकण्याची संधी मिळाली पण तेथील रितीरिवाज, हवामान, आहार, पोशाख याच्याशी त्यांना नाही जुळवून घेता आल. त्या डॉक्टर झाल्या पण तब्बेत पूर्ण ढासळली. म्हणून मिळालेल्या. संधी बरोबर स्वतःच्या आचार विचारात बदल करण्याची तयारी ही असायला हवी. आपल्या शारीरीक  मानसिक क्षमतेचा विचार करायला हवा. कष्ट करुन जे मिळवल ते उपभोगता आल पाहिजे. त्याचा आस्वाद घेता आला पहीजे. संधी सुखकारक असली पाहिजे तरच त्यात खरी गम्मत.