आनंदाची डोही आनंद तरंगे. 

आनंदाची कल्पना सापेक्ष आहे. पूर्ण आनंदी, समाधानी मनुष्य मिळणे कठिणच. अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा. त्या पूर्ण झाल्या की मनुष्य आनंदी असायला हवा. पण भल्या मोठ्या राज वाड्यात राजा दशरथ पुत्र रामाच्या दु:खाने मरण पावलाचकी. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा याबरोबर मनुष्य प्रेमाचाही भुकेलेला असतो.अर्थात सुग्रास भोजन आहे, परिधान करायला बहुमूल्य वस्त्रालंकार आहेत. रहायला भलेमोठे घर आहे. सभोवती निरतिशय  प्रेम  करणारे आप्तेष्ट आहेत. आणि प्रकृतीमात्र ठीक नाही.शरीर व्याधीने जराजर्जर झाले असेल तरी आनंदाचा उपभोग मनुष्य घेऊ शकत नाही. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, प्रेम याबरोबर शरीर स्वास्थ असेल तर आनंद मिळेल, असे काहीजण म्हणतात.

पण नाही केवळ अन्न, वस्त्र, निवारा, प्रेम, शरीरस्वास्थ या सर्व गोष्टी एखद्याकडे सुपूर्त केल्या तरच तो मनुष्य आनंदी असेल असेल अस म्हणणे ही बरोबर वाटत नाही. कारण स्वतः अर्धपोटी राहून इतरांना भोजन देणारे आनंदी संत महात्म्ये आपण पाहिलेत. "राजास त्या महाली सौख्ये किती मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या" असे म्हणणारा गरीबही आपण पाहिलाय. भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा एवढीच अपेक्षा करुन वसुधैव कुटुंबकम म्हणत फिरणारे एकांडे फकीरही आपण पहिले असतील. तेही आनंदात असतात. कारण या सर्वाच्या अपेक्षा मर्यादित असतात, आणि  वृत्ती समाधानी असते. म्हणजे समाधानीवृत्ती व मर्यादित अपेक्षा यातून आनंद मिळ्वता येतो.

"हरिश्चंद्राची फॅक्टरी" हा चित्रपट पाहीला. त्यातून भारतातील पहिल्या. चलतचित्रपट निर्मात्याच्या कार्याची ओळख तर झालीच पण त्याबरोबरच एका फाळके नावाच्या आनंदी कुटुंबाला भेटल्याचा आनंद अधिक झाला. थोरांपासून लहानांपर्यंत सारेच उत्साहाने मुसमुसलेले. हा उत्साह कसला? तर नवीन काहीतरी करून दाखवण्याचा. नवनिर्मिती चा एकच ध्यास. घरातील, धनदौलत, भांडीकुंडी सार त्यापुढे मातीमोल. सारीच जण ध्येयाने वेडी झालेली. विचार करायला, दु:ख करायला सवड आहे कुणला ? ध्येय गाठण हा एकच विचार. त्यासाठी लागेल त्या कष्टाची तयारी, समोर ध्येय असेल; तर कष्टातही आनंदाने रहाता येत हे; या सिनेमाने दाखवून दिल. आनंद प्राप्तीसाठी नको पैसा, नको गाडी, नको छानछोकीच्या वस्तू, नको सुग्रास जेवण. हवी फक्त ध्येय गाठण्याची जिद्द आणि त्यासाठी लागणारा आत्मविश्वास.

हाताला मराठीत 'कर' असा दुसरा शब्द आहे. हाताने सतत काम रहायच आणि डोक्यात विचार त्या कामाबाबतचेच . परीक्षा चालू होई पर्यंत मुले अभ्यास, प्रोजेक्ट यात गुंतलेली असतात. नवीन शिकण्याचा उत्साह, आनंद त्यांच्यात असतो पण एकदा का परीक्षा झाली की चार दिवस बर वाटत. मग "आता काय करु" चा भुंगा डोक पोखरायला लागतो. कंटाळा येतो. आणि नवीन काहीतरी उद्योग शोधण्याची गरज भासू लागते. ते मिळेपर्यंत चहेर्‍यावरचा आनंद कमी कमी होऊ लागतो. मुलांच कशाला निवृत्तीधारक प्रौढांचीही हीच कथा असते. घरात सार्‍या सुखचैनी असतात. मूलबाळ छान विचारपूस करत असतात. कशाची कमतरता नसते. तरी दु:खाचा सल मनात कुठेतरी असतो. आता काही करण्यासारख राहिल नाही. ही जाणीव मन जाळत रहाते.

म्हणून आनंदी रहायच तर कर्यरत व्हायच. कोणतही छोटे मोठे काम मनापासून, प्रामाणिकपणे करायच. त्यात इतक रंगून जायच की भविष्यकाळची चिंता आणि भुतकाळाचे सावट त्यात डोकावताच कामा नये. लोक काय म्हणतील?, नातेवाइकांत हस होइल कां?, यश येईल की अपयश याचा विचारच करायचा नाही. आणि मग या कार्यरुपी आनंदाच्या डोहात आनंदाच तरंगताना दिसेल.