पर्यटन 

पर्यटन हा शब्द आता आता रुढ झाला. पूर्वी सहल, यात्रा, प्रवास, या नावाने त्याला संबोधल जायचं. अगदी लहान असताना शाळेतून आमच्या वर्गाची जवळच्याच विठोबा मंदिरात नेलेली सहल मला अंधुक आठवते. वारी किंवा दिंडीच्या रुपात होती ती. सार्‍यांनी वारकर्‍यांसारखे पोशाख घातले होते दिंडी नाचवत आम्ही देवळात चालतच गेलो. टाळ, मृदुंगांसोबत आम्ही अभंग आरत्या म्हटल्या, प्रार्थना केली बाईंनी प्रसाद दिला. नंतर डबे उघडून आम्ही भोजन केले व पुन्हा शाळेत आलो. अशी छोट्या मुलांची ती छोटी सहल होती. जरा मोठ्या वर्गात गेल्यावर पुण्याची सहल अनुभवली आणि मग कॉलेजमध्ये असताना सहलीमधून गोवा पाहून आले. आताच्या पर्यटनाची माझी ओळख ही अशी सहलीतून झाली. तसे दर मे महिन्यात आजोळी प्रवास होतच होता. लाल एस-टी च्या बसमधून खडबडीत रस्त्याने केलेला तो प्रवास आजही अंगावर शहारे आणतो, कारण मीच नव्हे तर गाडीतले पाच सहाजण तरी ओकार्‍यांनी हैराण झालेले असायचे आणि त्याचा वास संपूर्ण प्रवासात दरवळत रहायचा. सामानानी आणि प्रवाशांनी गाडी खचाखच भरलेली असायची. त्यातच पाण्याच्या बाटल्यांतून लवंडलेले पाणी, गरम्याने हैराण होऊन आकांडतांडव करणारी छोटी मुले व त्यांच्यावर कातवणार्‍या त्यांच्या आया, विविध पदार्थांचे उग्र वास, कोंदट हवा, गाडीचे हेलकावे, धुळीचे लोट अशा अनेक गोष्टी आठवून तो प्रवासच नको व्हायचा. त्यामानाने आताचे पर्यटन एकदम मस्त. सोपे, सुटसुटीत आणि कमी कटकटीचे. नियोजन मात्र उत्तम हवे. पण त्याचीही कळजी नाही कारण त्यासाठी अनेक पर्यटनसंस्था मदतीला आहेतच. अनेक वाहन, अनेक मार्ग, त्यावर खाण्यापिण्यासाठी, तसेच मलमूत्र विसर्जनासाठी उत्तम हॉटेल्स आज पर्यटनाची मजा वाढवतच आहेत. पर्यटन स्यळांची माहिती मिळवण्यासाठीही अनेक पर्याय आज उपलब्ध आहेत. प्रवासाची, रहाण्याची, आगावू आरक्षणे करता येताहेत. मग अडचण कसली येणार? आर्यिक निजोजन व्यवस्थित केले की वर्षा दोन वर्षातून एकदा एखादी छोटी सहल सहज होऊन जाते.
        त्यामुळे पूर्वी फक्त देवदर्शन, लग्नमुंज समारंभ, किंवा सण उत्सवापुरताच गावाबाहेर पडणारी कुटुंब आता पार परदेशातही अगदी विनासायाल जाऊन येतात. आजच्या धकाधकीच्या जीवनात विरंगुळ्याचे चार आठ दिवस करमणूक करुन पुन्हा नव्या जोमोने कामाला लागतात आणि पुढील प्रवासाठी आर्थिक जमवाजमव सुरु करतात. शिवाय अनेक कंपन्या व सरकारी कार्यालयातून प्रवासभत्ताही देण्यात येतो.
 असे पर्यटन कधी संपूर्ण कुटुंबाबरोबर, तर कधी आम्ही 'दोघ राजा राणी' म्हणत, तर कधी मित्रमैत्रीणींच्या कंपूबरोबर ही केले जाते. आणि अगदी' एकला चलो रे' म्हणत बॅग खांदयाला अडकवून निजोजन न करता कुठेही कसेही भटकण्याचे थ्रील अनुभवणारे एकांडे शिलेदारही काही कमी नाहीत. या पर्यटनात परस्परांशी घडलेला संवाद, गप्पाटप्पा, खेळ करमणूकीचे कार्यक्रम यातून परस्परांची नव्याने ओळख व्हायला मदत होते.  मनातले सल, दु:ख कुठच्या कुठे निघून जातात आणि उरते फक्त मन: शाती, आणि मिळतो नवा उत्साह, ताजेपणा आणि टवटवीतपणा. एकाच आवडीनिवडीच्या, ध्येयाच्या विचारांच्या व्यक्ती एकत्र आल्यातर दुधात साखंरच त्या पर्यटनाचा  रंग काही विरळात होउन जातो. हे लक्षात घेऊन आज थीम पर्यटनाच्या कल्पना आस्तित्वात आल्या आहेत.
१) अरण्य पर्यटन- पक्षी, प्राणी, झाड यांच्या जवळ जाण्याची, त्यांचा अभ्यास व निरीक्षण करण्याची संधी अरण्य पर्यटनातून मिळते. शांत वातावरण, नैसर्गिक सौंदर्य, पशुपक्षी, झाडे झुडुपे यांची विविधता,
    यामुळे अरण्य पर्यटनात एक आगळी वेगळी मजा अनुभवायला मिळते.
२) साहसी पर्यटन - साहसाची ओढ प्रत्येक व्यक्तीला कमी अधिक प्रमाणात असतेच. इतरांपेक्षा काहीतरी  आगळवेगळ करत स्वतःला  अजमावण्याचा प्रयत्न प्रत्येक  जण करत असतो. कोणी  सायकलवरून  देशभर प्रवास करतो, कोणी गिरीशिखरे पादाक्रांत  करत, तर कोणी समुद्राचा तळ अजमावून येत. हे  सगळेच प्रयत्न साहसी पार्यटनात मोडतात. याशिवाय आज साहसी पर्यटनात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जसे१) स्कूबा डाइव्हिंग  २) रीव्हर क्रॉसिंग  ३) वाइल्ड लाइफ सफारी  ४) ट्रेकिंग ५) स्कीईंग-बर्फावरून  घसरणे  ६) राफ्टिंग  ७) कँम्पिंग  ८) हॉट एअर बलुनिंग  ९) हेलिस्किइंग   १०) पॅराग्लाइंडिंग   ११) रॉक क्लाइबिंग  १२) बंजी जंपिंग  १३) हायकिंग- गिर्यारोहण  १४) हँग ग्लायडिंग १५) क्याकिंग इ. अनेक पर्याय आज उपलब्ध आहेत.

३) सामाजिक पर्यटन -  समाजातील दुर्लक्षित घटकांविषयी आस्था असलेल्यांसाठी हा पर्याय आहे.
    समाजकार्यात रस असलेली लोक  अशा पर्यटनात सामील होउन सामाजिक कार्य करणार्‍या संस्था ,
    माणस यांच्या कार्याची ओळख करून घेतात. बाबा आमटे यांच आनंदवन, अभय बंग यांच शोधंग्राम,
    अनिल अवचटांच मुक्तांगण, अशी बरीच ठिकाण महाराष्ट्रात आहेत.

४) हेरिटेज पर्यटन - इतिहासाची साक्ष देणार्‍या वास्तू, गड, किल्ले, मंदिरे यांना भेट देऊन त्यांच्याविषयी माहिती मिळवण्यासाठी म्हणून केलेले पर्यटन ते हेरिटेज पर्यटन. त्यामुळे आपल्या वारसांची ओळख करुन घेतली जाते.

५) आयुर्वेद पर्यटन - केरळसारख्या राज्यातून ही संकल्पना मोठ्या प्रमाणावर राबवली जाते. हेल्थ
     रिर्सोर्ट्स, हेल्थ हॉलिडेज यांची उभारणी करुन त्याठिकाणी आयुर्वेदिक उपचार केले जातात. त्यासाठी
     त्याठिकाणी आयुर्वेदिक तज्ज्ञ व प्रशिक्षक यांची नेमणूक करण्यात येते. विविध व्याधींनुसार तसेच
     कालावधीनुसार दर ठरवण्यात आले आहेत.
६) शैक्षणिक पर्यटन-एखाद्या  विषयाच्या अभ्यासासाठी अनेक विद्याशाखांच्या कॉलेजमधून
     याचे आयोजन करण्यात येते. प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण देण्यासाठी याचा उपयोग होतो.
७) पावासाळी पर्यटन - पावासाळ्याच्या दिवसात सृष्टीचा तजेला अनुभवण्यासाठी तसेच धबधबे,
    नद्यानाले, समुद्र, पाऊस यांच्या सहवासात मौजमस्ती करण्यासाठी अशा सहलींचे आयोजन केले
    जाते.
८) शॉपिंग पर्यटन- ज्या लोकांना फक्त खरेदीचीच मजा अनुभ्वायची असते अशा लोकांनी शॉपिंग
    पर्यटनात सामील व्हावे.
९) खाद्य पर्यटन- खास खवय्या लोकच अशा पर्यटनाचा आनंद उपभोगू शकतील. देशोदेशींच्या विविध
    चवींचे, विविध स्वादाचे पदार्थ खाऊन रसनेला तृप्त करायचे असेल तर केवळ खाण्यासाठी फिरा अशी
    थीम घेऊन पर्यटन केले जाते
१०) क्रिकेट पर्यटन- क्रिकेट प्रेमींसाठी ज्या ठिकाणी क्रिकेट मॅच असेल तेथे जाऊन मॅच बरोबरच
      आजुबाजुची प्रसिद्दध ठिकाण पहाण्याची संधी अशा पर्यटनातून मिळते.
११) लिटररी टूरिझम- साहित्य प्रेमींना आकर्षक अशी ही थीम आहे. पुस्तक जत्रा, साहित्यसंमेलने,
      साहित्यिकांची घरे, गाजलेल्या साहित्यातील प्रेक्षणीय परिसर इत्यादि ठिकाणी भेटी दिल्या जातात.
१२) वैज्ञानिक पर्यटन- वैज्ञानिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मानवनिर्मित ठिकाणे किंवा नैसर्गिक
       चमत्कार पहाण्याची ओढ असणारे पर्यटकं अशा सहलीमंध्ये सहभागी होतात.
    एकंदरित थीम कोणतीही असो पर्यटनात सहभागी झालेली कोणतीही व्यक्ती पर्यटनाच्या अखेरीला अनुभवांचा अनमोल ठेवा, अमाप आनंद, गाढा आत्मविश्वास आणि अविस्मरणीय स्मृतींचा साठा घेऊनच परत येते.