काही अभंग २ 

तुझे रुप चित्ती राहो मुखी तुझे नाम
देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम ||धृ||
देह धारी जो जो त्यासी विहित नित्यकर्म
सदाचार नितीहूनी आगळा न धर्म
तुला आठवावे गावे हाच एक नेम ||१||
तुझ्यापदी वाहिला मी देह भाव सारा
उडे अंतराळी आत्मा सोडुनी पसारा
नाम तुझे घेतो गोरा म्हणुनी आठ याम ||२||
--- संत गोरा कुंभार.

अबीर गुलाल उधळीत रंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ||धृ||
उंबरठयाशी कैसे शिवू आम्ही जातिहीन
रुप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन
पायरीशी होऊ दंग गाऊनी अभंग ||१||
वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू
चंद्रभागेच्या पाण्याने अंगअंग न्हाऊ
विठ्ठलाचे नाम घेऊ होऊनि नि:संग ||२||
आषाढी कार्तिकी भक्तजन येती
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती
चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग ||३||
--- संत चोखा

संत कृपा झाली | इमारत फळा आली
ज्ञानदेवे रचिला पाया | त्याने बांधिले देवालया
नामा तयाचा किंकर | त्यानी केला हा विस्तार
जनार्दनी एकनाथ | स्तंभ दिला भागवत
भजन करा सावकाश | तुका झालासे कळस ||
--- संत जनाबाई