पेंटिंग 

पांढर्‍या शुभ्र कागदाकडे पाहताक्षणीच
मनात भावनांचा संचार होतो ||
प्रत्येकीलाच प्रकट व्हायचे असते
मग भावनांची चढाओढच सुरु होते ||
शुभ्र कागद अथवा कॅन्व्हास
कात टाकण्यास आसुसलेला असतो ||
त्यालाही ओढ असते रंगांची,
कुंचल्याचे फटकारे स्वतःवर झेलायची,
गार गार पाण्याचा स्पर्श अनुभवण्याची,
त्यावर पसरणार्‍या रंगांच्या गुदगुल्यांची ||
शेवटी कलाकार तयार होतो,
त्याच्या रंगांची, अन कुंचल्यांची, विविध आयुध घेऊन ||
कधी जाडसर थर, कधी रंगाचा सुका खरखरीतपणा,पण
प्रत्येक फटकार्‍यात आपल्या भावना प्रांजळपणे मांडत असतो ||
पण त्याचे चित्र तोपर्यंत पूर्ण होतच नाही,
जोपर्यंत त्याला आतून समाधान मिळत नाही ||
कदाचित तोपर्यंत अनेकविध पेंटिग्ज घडून जातात
पण अंतिम तेच असत ज्यात कलाकार स्वतःला
आरशासारखा स्वच्छ पाहू शकतो ||

                                                                  कवयित्री :- गार्गी कोचरेकर.