शोध 

पक्षियाने एका घेतली भरारी,
उंच उंच नभामधी |
म्हणे येतो महादेवास पाहुनी
पुरुनी जो उरला नभामधी ||
गेला उंचचउंच लक्ष कोस दूर किती
नाही दर्शन कर्पूरगौराचे परी |
मारीला सूर त्या खगाने
पुन्हा येई खाली पृथ्वीकडे ||
म्हणे आता जातो कैलासी
पाहतो तयासी जो चंद्रासी धारण करी |
गेला उंच कैलास शिखरी
परी रुपडे न दिसे तयासी |
म्हणे पाय रोवूनी धरेवरी पुन्हा
जातो बारा जोतिर्लिंगी, पाहतो क्षेत्रही गोकर्णा |
तपाचाही करीन भरणा,
मग तो गंगाधर लपेलच कसा ||
गेला ज्योतिर्लींगी गात स्तुती
केले तपही गोकर्णी, ध्यान न दिसे तरी |
केली पिंड वाळूची, जावूनी क्षेत्री हरिहेरेश्वरी
गाळली अश्रुची धार तयावरी ||
प्रार्थियले, विनवले, अन पुसले
सांग बा काय बरे चुकले माझे ? |
अवतरलाच नीलकंठ तयापुढे, म्हणे
वेडया ! हृदयात नाही का रे शोधियले ?||

                                                             कवयित्री  :-  गार्गी कोचरेकर.