पु. ल. देशपांडे 

विसाव्या शतकाचे वैभव, महराष्ट्र भूषण आणि पद्मश्री किताबाने गौरविले गेलेले; मराठी संस्कृती आणि मराठी माणसाची अस्मिता असलेले; पु. ल. देशपांडे यांचे पूर्ण नाव पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे असे होते. नावातच पुरुषोत्तम असलेले हे थोर साहित्यिक सर्वार्थानेच उत्तम होते. मुंबईतील गावदेवी भागातल्या किर्पाळ हेमराज चाळीत त्यांचा जन्म झाला. आणि जोगेश्वरी भागात त्यांचे सारे बालपण सरले.
पु. ल. देशपांडे म्हणजे अष्टपैलू व्याक्तिमत्व. आपल्या या लाडक्या लेकाला परमेश्वराने अनेक गुण बहाल केले होते. ज्या ज्या क्षेत्रात त्यांनी पदार्पण केले त्या त्या क्षेत्रात ते राजहंसाप्रमाणे चमकले. लेखणी हातात घेऊन साहित्य जगताचे ते अजिंक्य सम्राट बनले. कथा, कादंबर्‍या, लेख, प्रवास वर्णने, नाटके, व्यक्तिचित्रणे, कविता, गाणी, अशी साहित्याची विविध क्षेत्रे त्यांनी सहजतेने गाजविली. नट म्हणून ते प्रसिद्ध होतेच पण अनेक गाण्यांना सगीत देऊन संगितकार ही बिरुदावलीही त्यांनी संपादन केली. एक उत्कृष्ट वक्ते म्हणून ते नावाजले. एकपात्री नाटक, कथाकथन याची सुरुवातही  पु.लं. नीच केली.
"वेश बावळा परि अंतरी नाना कळा" यांचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आमचे पु. ल. देश्पांडे. खादीचा अघळपघळ लेंगा, जाड भिंगाच्या चष्म्यातून डोकावणारे मिस्कील डोळे, किंचित पुढे आलेले दोन दात, सदैव बोलण्यास उत्सुक असणारा हसरा चेहरा अस व्यक्तीमत्व असलेले पु. ल. चटकन कोणाचे लक्ष वेधून घेतील अस वाटत नाही. पण एकदा का वाणीचा धबधबा सुरू झाला कि, अपरिचितांनाही त्यापासून दूर जावे असे वाटणार नाही.
व्यक्तीचित्रणे लिहिण्यात त्यांचा हात धरणारा कोणीही नाही. आपल्या सूक्ष्म निरिक्षणाने आणि मार्मिक अवलोकनाने प्रत्येक व्यक्तीच्या बारकाव्यांचे, लकबींचे इतकेच नव्हे तर त्यांच्या भाषा वैशिष्ट्यंचे अगदी हुबेहुब वर्णन त्यांनी केले. म्हणूनच आज पंचवीस वीस वर्षाचा काळ लोटूनही त्यांनी लिहिलेली व्यक्तीचित्रणेच नव्हे तर प्रवास वर्णने, कथा,नाटके पुन्हा पुन्हा वाचाविशी व  ऐकाविशी वाटतात.
'विनोद' हा त्यांच्य साहित्याचा आत्मा. मराठी मनाला दु:ख विसरून हसायला शिकवले ते पु.ल. देशपांडे यांनीच. जीवनाला कंटाळलेल्या एका सैनिकाने म्हणे त्यांचा "माझी खाद्य यात्रा" हा लेख वाचला आणि' हे सारे पदार्थ खाण्यासाठीतरी मला जगले पाहिजे ' असे म्हणून आपला आत्महत्येचा विचार सोडून दिला. अशी कथा सांगितली जाते. त्यांच्या साठाव्या वाढदिवशी एका सफरचंदाच्या व्यापार्‍याने त्यांना सफरचंदांचा हार घातला. तेंव्हा ते उत्स्फूर्तपणे म्हणाले, "नशीब तुम्ही नरळाचे व्यापारी नाहीत." असा सहज जाता जाता विनोद करणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते.
'दातृत्व' हा पु. लं. चा आणखी एक गुण. अनेक गरजू संस्था, व्यक्ती यांना त्यांनी मदतीचा हात पुढे केला. अनेकांना लेखनात मदत केली. अनेक मानसन्मान मिळूनहीएक सामान्य मणूस म्हणून सामान्य मणसातलेच एक होऊन राहिले. साहित्यातील अनेक नवनविन प्रयोगांची यशस्वी सुरूवात करून नावाप्रमाणेच ते पुरुषोत्तम  ठरले. "झाले बहु होतील बहु परंतु यासम हाच" असेच त्यांचे वर्णन करावे लागेल.