पु. ल. देशपांडे यांची व्यक्तीचित्रणे 

साहित्याच्या सार्‍या अंगांना स्पर्श करून रसिकांच्या अंतरंगात विराजमान झालेले पु. ल. आपल्या नावाप्रमाणेच पुरुषोत्तम होते. आपल्या सहभागाने सर्व क्षेत्र उजळवून टाकणारा तो एक परिसखंडच म्हणावा लागेल. त्यांनी जे जे अंगिकारले ते ते सारे मनापासून अगदी अंतरीच्या उमाळ्याने केले. म्हणूनच त्यांच्या सर्वच कलाकृती उत्तमात गणल्या गेल्या.चित्रपट,लेखन, संगीत दिग्दर्शन,अभिनय इत्यादि क्षेत्रात सुरवातीला भ्रमण करणारे पु.ल. अधिक रमले ते लेखनामध्ये. लेखन साहित्याचे विविध प्रकार त्यांनी हाताळले. "तुज आहे तुजपाशी", "सुंदर मी होणार" यासारखी नाटके, "बटाट्याची चाळ", "असा मी असा मी",यासार्खे ललित लेख, "अपूर्वाई", "पूर्वरंग" सारखी प्रवासवर्णने, अनुवादलेखन, "व्यक्ती आणि वल्ली", "मैत्र", "गणगोत", "गुण गायीन आवडीने" यासारखी व्यक्तीचित्रणे लिहावीत तर ती  पु. ल. देशपांडे यांनीच.
साहित्याच्या डोहात स्वतः आनंदाने डुंबणारे, आणि रसिकांना डुंबायला लावणारे,पु. ल. देशपांडे मराठी मनाला अधिक आवडले ते त्यांच्या व्यक्तीचित्रणांमुळेच. मुळातच अधिकाधिक व्यक्तींची आवड असणार्‍या पु. ल. यांना ज्या ज्या व्यक्ती भेटल्या,आवडल्या त्यांचे जसेच्या तसे वर्णन पु.ल. नी केले ते या व्यक्तीचित्रणामधूनच. त्यामध्ये केसरबाई, मणिक वर्मा, ज्योत्स्ना भोळे, यासारख्या गायिका; म. वि. राजाध्यक्ष, कर्णिक, गोखले, इत्यादि साहित्यिक मित्र; ऋग्वेदी, अप्पा, यासारख्या आप्तस्वकीयांबरोबरच गजा खोत, अंतु बर्वा, नामू परीट यासारख्या व्यक्तींचाही त्यांनी समावेश केलेला आढळतो. अर्थातच या व्यक्तीचित्रणातील व्यक्ती काल्पनिक नाहीत तर त्या त्यंना कोठे ना कोठे तरी भेटलेल्या आहेत. त्या व्यक्तींबद्दल त्यांच्या मनात प्रेम, आदर, आपुलकी आहे. त्या व्यक्तींच्या आनंदात ते सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्या दु:खाने होरपळूनही गेलेले आहेत.
तस पाहिल तर पु. लं.च्या व्यक्तीचित्रणात खून, मारामार्‍या, प्रणयक्रिडा, सामाजिक प्रश्न, राजकीय रहस्ये वगैरे मसाला काहीही नाही. तरीपण ती वाचकांना पुन्ह पुन्हा वाचाविशी वाटतात. याचे कारण त्यांची साधी, सोपी, सरळ, सामान्यांना कळणारी आणि म्हणूनच आपलीशी वाटणारी भाषा. त्यांचे शब्द सामर्थ्य इतके अफाट की, त्यांना आपल्या लिखाणात कधी अलंकारिकतेची जोड द्यावी लागली नाही. त्यांचा प्रत्येक शब्द तोलूनमापून  वापरलेला व नेमका अर्थ सांगणारा असा आहे. विद्वत्ताप्रचूर भाषा, लंबीचौडी वाक्य, व अनाकलनीय शब्द त्यांच्या लिखाणात आढळत नाहीत. जे पाहिल, जे अनुभवल त्याच तसच्या तस वर्णन त्यांनी केले आहे. त्यांच्या लिखाणात जशी काल्पनिकता नाही तस हातच राखून ठेवलेलही काही आढळत नाही.
पु. लं. च्या लिखाणात प्रवाहपतितता आहे. सहज गप्पा मारण्याचा सूर त्यात आहे. पण त्या गप्पा कधी मार्गदर्शनपर झाल्या नाहीत. त्यात कोणतेही तत्त्वज्ञान सांगितलेले नाही. त्यांचाच आदर्श असलेल्या प्रसिद्ध इंग्रजी लेखक वूडहाऊसच्या लिखाणाचा ठसा त्यात आढळतो. त्यांच्या व्यक्तीचित्रणातील पात्र नाटकातल्या पात्रांसारखी हलती आहेत. त्यांची सतत काहीतरी हालचाल, धावपळ चाललेली असते. म्हणूनच त्यांच्या व्यक्तीचित्रणात नादमयता आहे. एक एक प्रसंग आपल्यासमोर घडत असल्याचा भास त्यांची ही व्यक्तीचित्रण वाचताना होतो. कदाचित अभिनयाचे अंग जात्याच असल्याने पु. ल. ना ते जमले असावे.
आपल्या मार्मिक अवलोकनाने व सूक्ष्म निरिक्षणाने त्यांनी आपली प्रत्येक व्यक्तीरेखा अजरामर केली. त्यांच्या स्वभावातील बारकाव्यांचे, लकबींचे वर्णन त्यांनी केलेच. पण प्रत्येकाच्या भाषावैशिष्ट्याचाही त्यांनी अंगिकार केला. "व्यक्ती आणि वल्ली" मध्ये पेस्तनजीची पारशी भाषा, रावसाहेबांची शिवराळ भाषा,आणि सखाराम गटणेची साहित्यिक भाषा आगदी हुबेहुब आत्मसात केली आहे.
"विनोद" हा पु. लं. चा स्थायिभाव. व्यक्तीचित्रणे रेखाटतानाही त्यांनी विनोदाला हाताशी धरले आहे. अर्थात या विनोदाचा त्यांनी वाटेल तसा वापर केलेला नाही. विनोदाबरोबर ते वहावत गेले नाहीत. त्यांच्या विनोदाला घरंदाजाची बंधने आहेत. शालिनता आहे. अगदी खालच्या दर्जाचा विनोद त्यांनी केला नाही. "टवाळा आवडे
 विनोद" असे रामदास स्वामींनी म्हटले आहे. तशी टवाळकीही त्यांच्या विनोदात दिसत नाही. त्यांचा विनोद म्हणजे सहज हलकाफुलका ,उत्स्फूर्तपणे सुचलेला असा आहे. त्यांचे विनोद समजायला फार मोठी प्रगल्भता हवी असे नाही कारण ते विनोद आपल्या आसपास कोठेतरी केंव्हातरी घडलेले असतात.
पु. लं. नी ज्या व्यक्तीरेखा चित्रित केल्या; त्याबद्दल त्यांच्या मनात आदर, प्रेम, कौतुक आहे." व्यक्ती आणि वल्ली" वाचताना पु. लं. ची एक वैशिष्ट्यपूर्ण शैली आढळते. आपण चित्रित केलेली प्रत्येक व्य्क्ती विनोदाच्या वस्त्रप्रावरणात लपेटण्याच्या प्रयत्नात हळूच नकळत त्यांच्या मनातला सल, दु:ख उघड करण्याची हातोटी पु. लं. ना साधली आहे. जीवनात सुखाबरोबर दु:खाचे आणि विनोदाबरोबर कारुण्याचे अस्तीत्व ते मान्य करतात. त्यांचा "अंतु बर्वा", "नारायण", "चितळे मास्तर", किंवा "नंदा प्रधान" वाचताना हसता हसता डोळे कधी ओले होतात ते समजत नाही. त्यांचा विनोद हा असा कारुण्याची झालर असणार आणि विचारांना चालना देणारा आहे. त्यांच्या व्यक्तीचित्रणांचा एक साचाच ठरून गेलेला आहे. विनोदाचा हात धरून येणार्‍या या व्यक्तींचे दु:ख नकळत उघडे होऊ लागते आणि असे होत असतानाच पु. ल. त्या व्यक्तीला निरोप देऊन व्यक्तीचित्रणाचा शेवट करतात.
पु.लं. नी आपल्या व्यक्तीचित्रणांवर अफाट प्रेम केले. आणि म्हणूनच त्यांना पुस्तकात बंदिस्त करून न ठेवता एकपात्री प्रयोग, कथाकथन यांच्या रुपाने पुस्तकाबाहेर काढले. आणि खूप फिरवले. त्यामुळे सुशिक्षितांबरोबर अशिक्षित आणि वाचनाची आवड असलेल्यांबरोबर आवड नसणारेही त्यांचा आस्वाद घेऊ शकले.
मनात दु:खाचा सल ठेऊन वरपांगी आनंदाचे प्रदर्शन करणारी, आहे त्या परिस्थितीत सुख मानणारी सरळ मध्यममार्गी  व्यक्तींचे चित्रण पु. लं. नी केले. पण त्यांच्या वागणुकीचे मनोविश्लेषण त्यांनी कधी केले नाही. किंवा त्याद्वारे प्रत्येक वेळी वाचकांना उपदेशाचे डोसही पाजले नाहीत. आपल्या लिखाणातून नवनिर्मितीचा आनंद स्वतः घेणे; व वाचकांना वाचनाचा आनंद मिळवून देणे इतकाच देवीघेवीचा व्यवहार त्यातून त्यांना अपेक्षित होता.