संत नामदेव 

महाराष्ट्रात संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी विट्ठलभक्तीची मुहूर्तमेढ रोवली. नामदेव हे त्यांनी दाखविलेल्या मार्गाचे पहिले प्रवासी. सामान्य शिंपी संतपदाला पोहचू शकतो, कविता आणि अभंग रचू शकतो,नामस्मरणांनी परमेश्वर भक्ती करू शकतो,हे नामदेवांच्या उदाहरणांनी लोकांना समजले. आणि सामान्य जनता त्याकाळात भक्तीमार्गाकडे वळली.
सन १७२० ते १७५० हा नामदेवांचा काळ समजला जातो. महाराष्ट्रात पंढरपूर नावाच्या गावी दामाशेठी नावाच्या तयार कपडे विकून उदरनिर्वाह करणार्‍या शिंप्याच्या घरी नामदेवांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव गोणाई व पत्नीचे नाव राजाई असे होते. इश्वराची मैत्री करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे नाममार्ग असे सांगणारे पहिले संत म्हणजे संत नामदेव. "अखंड हरीनाम" हाच ईश्वरभक्तीचा अत्यंत सोपा मार्ग आहे असे ते लोकांना सांगत. नामदेव गृहस्थाश्रमी होते. प्रपंचात राहूनही भक्तीमार्ग स्वीकारता येतो; आयुष्याच्या कोणत्याही वळणावर माणूस हरीभक्तीकडे वळू शकतो आणि स्वतःचे जीवन उच्चतम पातळीपर्यंत नेऊ शकतो, हे स्वतःच्या उदाहरणांनी त्यांनी लोकंना पटवून दिले. तसेच परमेश्वर भक्तीमध्ये जातीपातीचा अडसर येत नाही हेही त्यांनी लोकांना पटविले,संत नामदेव स्वतः शिंपी समाजाचे होते. मनाचा प्रामाणिकपणा आणि सरलता याच गोष्टी आपणाला ईश्वरापर्यंत नेऊन पोहचवितात असे ते म्हणत.
नामदेवांनी महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचा पाया घातला. ईश्वरभक्तीबरोबरच करमणूकीतून सद्विचारांची पखरण करण्यासाठी त्यांनी "कीर्तन" परंपरा समाजात रूढ केली. झांज, टिपर्‍या, चिपळ्या आदि वाद्याबरोबर नृत्य, गायन, अभिनय करत लोक तीर्थयात्रा करू लागले. एकमेकांचे अनुभव,विचार कथा कथन करू लागले. ईश्वर भक्तीच्या निमित्ताने लोक एकत्र येऊ लागली. आणि ईश्वर भजनी रंगू लागली. अभंग, ओव्या रचल्या जाऊ लागल्या. त्यातून आत्मविश्वास वाढला. मराठी भाषा वाढू पसरू लागली.
ज्ञानेश्वरांच्या सहवासात नामदेवाचे जीवन फुलत गेले. ज्ञानेश्वरांच्या मृत्युनंतर नामदेवांनी भजन,कीर्तन,प्रवचन करत उत्तरेकडे प्रवास केला.भागवत धर्म व भक्तीसंप्रदायाची प्रेरणा नामदेवांनी लोकांना दिली. ते जेथे जेथे गेले तेथील लोकांत ते मिसळले. नामदेव गुजराथी, हिंदी, पंजाबी भाषा शिकले होते. इतकेच नव्हे तर या भाषांमधून त्यांनी अनेक पदे रचली. शिखांच्या "नानकसाहेब"ग्रंथात नामदेवांच्या रचनांचा समावेश आहे. नामदेवांच्या भक्तीरसाने प्रभावित होऊन अनेक शीख लोक त्यांचे शिष्य बनले. काहीजण तर स्वतःला "नामदेव शिंपी" म्हणवून  घेऊ लागले. भक्तीचा महिमा नामदेवांनी सर्वत्र पसरविला. अनेक वर्ष महाराष्ट्राबाहेर फिरल्यानंतर ते पुन्हा महाराष्ट्रात पंढरपूरात येऊन राहू लागले. आणि विट्ठल भक्तीत रममाण झाले. वयाच्या ऐंशीव्या वर्षी नामदेवांनी पंढरपूरला पांदुरंगाच्या देवळाच्या मुख्य द्वारापाशी समाधी घेतलीं. "नामदेवाची पायरी" म्हणून आजही लोक तेथे नतमस्तक होतात.