समर्थ रामदास 

                                                     शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे |
                                                      वसिष्ठापरि ज्ञान योगेश्वराचे|
                                                      कवी वाल्मिकासारिखा मान्य ऐसा | 
                                                      नमस्कार माझा तया रामदासा ||
असे ज्यांचे वर्णन केले जाते ते समर्थ रामदास स्वामी; एक महान संत होते. इशोपवासनेबरोबरच बलोपासनेला महत्त्व देणारे, लोकसेवेबरोबरच लोकोद्धाराचे कार्य करणारे आणि लहानांपसून थोरांपर्यंत सार्‍यांनाच सदाचाराचा मार्ग दाखवण्यसाठी साध्या सोप्या भाषेत अखंड लेखन करणारे, रामदास स्वामी इतर संतांपेक्षा वेगळे वाटतात.
समर्थांचा जन्म सन १६०८ मध्ये जांब या गावी चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच रामनवमीला एका रामभक्ताच्याच घरात झाला. त्यांचे वडील सूर्याजीपंत ठोसर व आई राणूबाई तसेच भाऊ गंगाधर हे सारेच रामोपासनेत मग्न असणारे असे होते. आई वडिलांनी हौसेने त्यांचे नाव नारायण असे ठेवले. पण वयाच्या बाराव्या वर्षी लग्नमंडपातून पळालेल्या या नारायणाने नाशिकजवळील टाकळी येथे बारा वर्ष रामनामाचा जप केला. त्यांना रामाने दर्शन दिले. आणि त्यांचे सारे जीवनच राममय होऊन गेले. त्यांचे नारायण नाव लुप्त होऊन लोक त्यांना रामदास म्हणू लागले. ते भिक्षेसाठी निघाले की स्वरचित श्लोक म्हणत असत. आणि त्याबरोबरच "जय जय रघुवीर समर्थ" अशी आरोळी देत.म्हणून मग लोक त्यांना नुसतेच रामदास न म्हणता "समर्थ रामदास" असे म्हणू लागले.
बारा वर्षाच्या तपश्चर्येनंतर समर्थ देशाटनाला व तीर्थाटनाला निघाले. अनेक तीर्थक्षेत्रांना त्यांनी भेटी दिल्या. परकीयांच्या आक्रमणाने भ्रष्ट झालेली तीर्थस्थाने, अयोध्या, काशी, मथुरा येथील मुसलमानांनी उध्वस्त केलेली मंदीरे त्यांनी पाहिली. स्वार्थी, भित्रे लोक व त्यांच्यावरील परकीयांचे पाशवी अत्याचार त्यांनी पाहिले. आणि मग लोकांमध्ये आत्मतेज जागृत करण्याचे व लोकांना स्वधर्माची शिकवण देण्याचे त्यांनी ठरविले. नगरोनगरी,गावोगावी देवळे, मठ यांची स्थापना केली. ठिकठिकाणी अकरा मारुतींची प्राणप्रतिष्ठा केली. रामोपासनेचा संप्रदाय सुरू केला. सर्व राष्ट्रात त्यांनी उपासनेचे चैतन्य ओतले. कर्तृत्वाची प्रचंड ज्योत पेटवली. समर्थांची शिस्त मोठी कडक. गबाळेपणा त्यांना मुळीच खपत नसे. शिस्तीने,मर्यादेने, व्यवस्थेने वागण्याचा धडा त्यांनी घालून दिला. ते म्हणत,         
                                                      "सामर्थ्य आहे चळवळीचे | जो जो करील तयाचे |
                                                       परंतु तेथे भगवंताचे | अधिष्ठान पाहिजे ||"
समर्थांचे जीवन म्हणजे अखंड भ्रमण.त्यांचा संचार सर्व ठिकाणी होता. केवळ भारतातच नव्हे तर नेपाळ, काबूल, कंदाहारपर्यंत ते जाऊन आले. आणि अनेक शिष्य जमविले. महाराष्ट्रात स्वराज्य स्थापणार्‍या शिवरायांचे ते गुरू होते. स्वराज्य स्थापनेस अनुकुल वातावरण निर्माण करण्यास त्यांनी जशी शिवरायांना मदत केली तसेच स्वराज्यनिर्मितीत मार्गदर्शनही केले. "तुझा तू वाढवी राजा" असे तुळजापूरच्या भवानीमातेला स्वराज्यासाठी साकडे घालणारे समर्थ रामदास मराठी मनाला अधिक जवळचे वाटतात ते यामुळॅच.
समर्थांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण लोकोद्धारात खर्च झाला. ''धर्मवृद्धीतच राज्यवृद्धी आहे'' असे ते म्हणत. दैववादापेक्षा प्रयत्नवादाला आणि शब्दांपेक्षाही अनुभवाला त्यांनी अधिक महत्त्व दिले.लोकजागृतीसाठी अफाट ग्रंथ रचनाही केली. दासबोध, मनोबोध [मनाचे श्लोक ], हजारो आरत्या, अभंग रामसांनी रचले. त्यांची भाषा प्रभावशाली पण सर्वांना समजेल अशीच होती.
समर्थांनी विश्वोद्धाराची चिंता केली. स्वतः लग्न केले नाही पण अवघ्या महाराष्ट्राचा प्रपंच केला. राजकारण अचुक व यशस्वी कसे करावे ते शिकविले. धर्म स्थापना स्वतः तर केलीच पण इतरांकडूनही करवून घेतली. आपल्या प्रिय शिष्याकरवी स्वराज्यसुख प्रजेच्या हाती देऊन महाराष्ट्रीय जनतेचा उद्धार केला. आणि वयाच्या चौराहत्तराव्या वर्षी सज्जन गडावर आपला देह ठेवला. "मरावे परी कीर्तीरुपे उरावे." हे आपले वचन खरे करून दाखवले. शेवटी त्याच्याच श्लोकात सांगायचे झाले तर ,
                                                             "सदा देवकामाजी झिजे देह ज्याचा |
                                                               सदा रामनामे वदे नित्य वाचा ||
                                                              स्वधर्माची चाले सदा उत्तमाचा |
                                                              जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ||