रवींद्रनाथ टागोर 

बंगालमध्ये सहा मे १८८१ मध्ये रवींद्रनाथांचा जन्म लौकिकवंत अशा ठाकूर घराण्यात झाला. ऐश्वर्यसंपन्न पण साधी रहाणी व उच्च विचारसरणी हे ठाकूर घराण्याचे वैशिष्ट्य होते. आदराचे माहेरघर, पवित्रतेचे शिखर, आणि कलासंस्कृतीचे आगर असलेल्या या घराण्यातील अनेकांचे सामाजिक सांस्कृतिक कार्य वाखाणण्यासारखे होते. त्यांचे वडील देवेंद्रनाथ यांनी "वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन" हेच आपले जीवितकार्य मानले होते. त्यासाठी त्यांनी "तत्त्वबोधिनी" सभेची स्थापना केली होती. या सभेची ''तत्त्वबोधिनी पत्रिका" प्रसिद्ध करून त्यामार्फत खगोलशास्त्र, शिक्षण शास्त्र, स्त्रियांची सुधारणा, शेतकर्‍यांचे दैन्यनिवारण, मिशनर्‍यांचे धार्मिक आक्रमण, आदि अनेक प्रश्न त्यांनी समाजापुढे आणले.राजाराम मोहनरायांनी स्थापन केलेल्या "ब्राम्हो सभे"चे रुपांतर त्यांनी "ब्राम्हो समाजा" मध्ये करून त्याला आधुनिक बुद्धिमंतांचे धर्मपीठ बनविले. मूर्तीपूजेच्या व जातीयतेच्या दलदलीत फसलेल्या वैदिकधर्माचे पुनरुज्जीवन करणे हे त्यांचे जीवितकार्य असले तरी राष्ट्रनिर्मितीच्या कार्यातही त्यांनी मोठा हातभार लावला. त्यांच्या धर्मनिष्ठ कार्यामुळे लोक त्यांना "महर्षी" असे म्हणत असत. अशाप्रकारे देवेंद्रनाथांसारख्या पित्याचा रवींद्रनाथांच्या संस्कारसुलभ मनावर खोल परिणाम झाला. आपल्या वडिलांबरोबर ते हिमालय भ्रमणही करून आले होते. "शांतिनिकेतन" ही त्यांच्या वडिलांची ध्यानभूमी होती. रवींद्रनाथांच्या आईचे नाव शारदादेवी असे होते.
रवींद्रनाथ वयाच्या आठव्या वर्षी शाळेत जाऊ लागले. पण शाळेऐवजी रस्त्यातील देखाव्यांकडेच त्यांचे मन अधिक रमत असे. जे पाहिले त्यावर ते खूप विचार करत असत. शालेय शिक्षणात त्यांचे मन कधीच रमले नाही. स्वच्छंदविहार, निरिक्षण, मनन-चिंतन, एकांतवास या गोष्टी त्यांना अधिक प्रिय होत्या. म्हणूनच ते उत्कृष्ट काव्यलेखन व ग्रंथलेखन करू शकले. रवींद्रनाथांच्या जीवनाचा अवाढव्य व्याप पाहिला की मती कुंठीत होऊन जाते. एकाच माणसाने इतकी अफाट आणि विविध निर्मिती केली आहे यावर विश्वासच बसत नाही. शिक्षण, राजकारण, समाजकारण,खेड्यांची रचना, गृहरचना, परंपरागत उद्योगांचा विकास, जुन्या नव्या शास्त्रांचा पायाशुद्ध अभ्यास,वेशभूषा, सणसमारंभ, इत्यादि जीवनाच्या सर्वच लहानसहान गोष्टीत ते रस घेत असत. त्या संपन्न, सहजसुंदर व्हाव्यात म्हणून ते प्रयत्नशील असत. कविता, गीते, नाट्य, कथा, कादंबरी,निबंध, पत्र इत्यादि साहित्यप्रकार तसेच संगीत, चित्र, नृत्य, नाट्य,अभिनय,इत्यादि सर्वच कलाप्रकारांचा विकास ते अगदी सहजतेने करत राहिले. रवींद्रनाथांनी जीवनावर प्रेम करायला शिकविले. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ते कोणत्या ना कोणत्या कार्यात गुंतलेले असत.याचमुळे त्यांचे शरीर सदैव चपळ, काटक, कसदार आणि मन व बुद्धी तरल राहिली.
महात्मा गांधींनी त्यांना "महान पहारेकरी" असे म्हटले आहे.कारण सनातन जीवनमूल्यांचा शोध घेऊन त्यांना जपणे, त्यांना फुलवणे यावर आधारित कथा,कादंबर्‍या लिहिणे हेच त्यांचे जीवनमूल्य होते. वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी पहिली कविता लिहिली. आणि त्यानंतर पुढे सत्तर वर्षाच्या कालखंडात त्यांचे पन्नास काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. त्यांनी हजारावर कविता, दोन हजार गीते लिहिली. त्यांच्या काव्यात विपुलता, विविधता आढळते. काव्यालाच त्यांनी "जीवनसाधना" मानले होते. निसर्ग कविता, प्रेम कविता, भक्ती कविता, राष्ट्रीय कविता असे काव्याचे जवळजवळ सर्व प्रकार त्यांनी हाताळले. त्यांच्य काव्यात सूचक, समर्पक व सुबोध शब्दरचना व भावानुकुल नाद,तालाचा मेळ आढळतो. म्हणूनच त्यांच्या "गीतांजली" काव्यसंग्रहाला सन १९१३ मध्ये जगप्रसिद्ध असे नोबेल पारितोषिक मिळाले. कथालेखक म्हणूनही रवींद्रनाथांनी नाव कमावले. त्यांचे कथालेखन विपुल नसले तरी आशय व आविष्काराच्या बाबतीत त्यात विविधता व वैचित्र्य आढळते. त्यांच्या कथेचे तंत्र स्वतंत्र होते. बा. भ. बोरकर यांनी म्हटल्याप्रमाणे ते भारताचे पहिले रससिद्ध लघुकथाकार होते. कथेला उठाव देणारे मोजकेच व वेधक तपशील, मनुष्य स्वभावाचा तळ गाठण्याचे अचाट सामर्थ्य, लिखाणातील सहजता, मानवी मनोव्यापारंच्या गुंतागुंतीचे अभूतपूर्व दर्शन, ही त्यांच्या कथेची ठळक वैशीष्ट्ये सांगता येतील. नाट्य व चित्रकलेमध्येही रवींद्रनाथांनी अनेक प्रयोग केले. आणि त्यात ते यशस्वीही झाले. रवींद्रनाथांचे वडील देवेंद्रनाथ यांनी कलकत्याजवळ "बोलापूर" येथे टेकडीवर जमीन खरेदी करून एक मंदीर बांधले. तेच "शांतीनिकेतन" म्हणून प्रसिद्ध झाले. पुढे रवींद्रनाथांनी तेथेच एक आश्रमीय शाळा काढली. ती पुढे विश्वविद्यालय बनली आणि "विश्वभारती" या नावाने प्रसिद्ध झाली. दिनाक ७ ऑगस्ट १९४१ रोजी रवींद्रनाथांची जीवनज्योत मालवली.