विंदा करंदीकर 

महाराष्ट्रतील थोर साहित्यिक विंदा करंदीकर यांचा जन्म महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील "घालवली" या गावी दिनांक २३ अ‍ॅगस्ट १९१८ मध्ये झाला. गोविंद विनायक करंदीकर हे त्यांचे मूळ नाव . पण "विंदा" या टोपण नावांनी त्यांनी कविता लेखनास प्रारंभ केला. "स्वेदगंगा" या आपल्या पहिल्या काव्यसंग्रहातून त्यांनी आपली बहुमुखी कविता सिद्ध केली.व्यवसायाने इंग्रजीचे प्राध्यापक असलेल्या विंदांची कवितेबरोबरच लघुनिबंध, समीक्षाग्रंथ, बालकविता, बडबड गीते,इत्यादि साहित्यक्षेत्रातील कामगिरी अजोड आहे. त्यांनी विरूपिका रचल्या तसेच चार्वाक, हेगेल आदि पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा छंदबद्ध परिचय लिहिला. ज्ञानेश्वरांच्या "अमृतानुभावा"चे अर्वाचीन मराठीत रुपांतर करताना त्यातील कवितेची धार आणि लय अजिबात बोथट होऊ दिली नाही. साम्यवादी क्रांतीचे स्वागत करणार्‍या त्यांच्या कवितेत प्रतिभेचे विलक्षण सामर्थ्य दिसून येते. त्यांच्या कवितेत गेयता, आशयगर्भितता, सोपी शब्द रचना ही वैशिष्ट्ये दिसून येतात. त्यांच्या छोट्या तसेच दीर्घ कवितांमध्ये जीवनाचे सार सामावलेले आहे. विंदांचे वागणे, दिसणे आणि रहाणे सारेच सैल, ढगळ आणि विक्षिप्त असले तरी त्यांच्या विचारांना मात्र निश्चित दिशा आणि शिस्त होती. कविता वाचनाचे फड गाजविणार्‍या विंदांनी काव्यलेखनाबरोबरच सुतारकामापासून मोचीकामापर्यंत अनेक छंद जोपासले.
विंदांचे बालपण मात्र फार कष्टात गेले. वयाच्या चौदाव्या वर्षी ते एका आचार्‍याबरोबर कोल्हापूरला आले. त्यांनीच त्यांना वार लावून दिले. मग पुढील इंग्रजी शिक्षणाला सुरूवात झाली. कोल्हापूर येथील राजाराम कॉलेजात गेल्यावर डॉ. माधवराव पटवर्धन यांच्या व्यक्तिमत्वाने व काव्याने ते भारावले गेले. आणि त्याच्या प्रभावाने कवितेला भरदार रूप प्राप्त झाले. पुढे वाचन व विचार वाढत जाऊन मार्क्सवाद व आधुनिक विज्ञान यांच्या प्रेरणाही त्यांना मिळाल्या. त्यांच्या साहित्यसेवेतील कामगिरीबद्दल त्यांना "कबीर सन्मान", "जनस्थान पुरस्कार", "कोणार्क सन्मान", विद्यापीठांच्या 'डि. लिटस."असे अनेक सन्मान मिळाले. आठ तत्त्वचिंतकांच्या विचारांचे छंदोबद्ध काव्यरूप असलेल्या "अष्टदर्शन"या साहित्यकृतीसाठी साहित्यक्षेत्रातील सर्वोच्च प्रतिष्ठेचा असा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी प्राप्त झाला.