आचार्य विनोब भावे 

महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात "गागोदे" नावाच्या गावात ११ सप्टेंबर १८९५ या दिवशी आचार्य विनोबा भावे यांचा जन्म झाला.त्यांचे पाळण्यातील नाव विनायक असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव नरहरपंत असे होते. त्यांचे आजोबा शंभूराव हे ईश्वरभक्त होते. त्यामुळे त्यांचा घरातील वातावरण धार्मिक होते. पण घरात जातीभेद, धर्मभेद पाळला जात नसे.सर्व ईश्वराचीच लेकरे आहेत हीच शिकवण लहानपणापासून त्यांच्या मनावर बिंबविली गेली.भक्ती आणि त्यागाचे धडे शंभूरावांकडूनच विनायकाला मिळाले. विनोबांची आजी कर्तबगार व करारी होती. वयाची पन्नाशी ओलांडल्यावर ती लिहायला, वाचायला शिकली. विनोबांचे वडील गुजरातेत वडोदरा येथे होते. त्यामुळे त्यांचे बालपण आजीआजोबांजवळच गेले.
इंग्रजी तिसरीपर्यंत विनायक घरातच शिकले. फक्त चित्रकला शिकण्यापुरते ते शाळेत जात. पण त्यांचे मित्रमंडळ मोठे होते. सारेचजण देशप्रेमाने भारलेले, अभ्यासूवृत्तीचे पण मनस्वी होते. लोकमान्य टिळकांचा त्यांच्यावर प्रभाव होता. टिळकांनी "गीतारहस्य" हा ग्रंथ लिहिला हे कळताच सर्व मुलांनी गीतेचा अभ्यास करायला सुरुवात केली. शाळेमध्ये पासापुरता अभ्यास करावयाचा व बाकीचा वेळ इतर वाचनात घालवायचा असा त्यांचा दिनक्रम होता. हळूहळू शालेय शिक्षणावरचा त्यांचा विश्वास उडू लागला. गांधीजींची भाषणे त्यांनी ऐकली आणि गांधीजींची निर्भय सत्यनिष्ठा त्यांना आवडू लागली. शालांत परीक्षेसाठी मुंबईला न जाता ते सरळ गांधीजींच्या आश्रमात गेले. गांधीजींनीच त्यांना "विनायक" ऐवजी 'विनोबा' म्हणायला सुरुवात केली. आश्रमात पडेल ते काम गांधीजी व इतर आश्रमवासी करत. विनोबाही त्यात सामील झाले. त्यानंतर ते वर्धा येथे सेवाग्राम आश्रमात राहू लागले. विनोबांच्याच पुढाकाराने अनेक ठीकाणी "ग्रामसेवामंडळे" स्थापन झाली. त्यांच्या मदतीला अनेक तरूण मंडळी येऊन विधायक कामे करू लागली.
विनोबांनी गीतेचा सखोल अभ्यास करून त्याचा मराठीत अनुवाद केला. त्याला "गीताई" असे समर्पक नाव दिले. कारण 'संस्कृत भाषेत असलेला आपला हा धर्मग्रंथ सर्वसामान्यांना कळावा यासाठी आपल्या मुलाने त्याचे मराठीत भाषांतर करावे' अशी त्यांच्या आईचीच इच्छा होती. स्वातंत्र्य लढ्यात सामील झालेले विनोबा १९३२ मध्ये धुळ्याच्या तुरुंगात होते. तेथे त्यांनी सत्याग्रहींच्या आग्रहावरून गीतेवर सुंदर प्रवचने दिली. साने गुरुजींनी ती लिहून काढली. आणि पुढे ती पुस्तकरूपाने प्रसिद्ध्य झाली. विनोबांनी "स्थितप्रज्ञ दर्शन", "स्वराज्य शास्त्र" अशी अनेक पुस्तके लिहिली. विनोबांनी सर्व धर्मांचे सारग्रंथ तयार केले. "कुराणसार", "ख्रिस्तधर्मसार", अशी पुस्तके त्यांनी लिहिली. सत्य, प्रेम, करुणा हेच सर्व धर्मांचे सार आहे असे ते म्हणत. अध्यात्म आणि विज्ञान याचे विनोबांना अवधान होते. आणि त्यामुळेच त्यांनी "जयजगत" ही घोषणा दिली.
वैयक्तिक सत्याग्रह चळवळीच्या वेळी "पहिला सत्याग्रही" म्हणून गांधीजींनी विनोबांची निवड  केली. विनोबांनी "भूदान चळवळ" सुरू केली. त्यासाठी तेरा वर्ष पदयात्रा करून त्यांनी जवळजवळ पस्तीस लाख एकर जमीन दान म्हणून मिळवली. आणि ती भूमीहिनांना वाटली. "काम करण्याची कुवत व इच्छा असणार्‍या प्रत्येकाला काम मिळाले पाहिजे" असे ते म्हणत. राजकीय जीवनात शुचिता, आर्थिक जीवनात साम्यता आणि सामाजिक जीवनात प्रेम हवे असे त्यांना वाटे.
जीवनाच्या अखेरच्या पर्वात त्यांनी क्षेत्रसंन्यास घेतला होता. ते पवनार येथेच रहात होते. १५नोव्हेंबर १९८२ रोजी त्यांचे निधन झाले.