भूपाळ्या 

१.]   झाली सकाळ सकाळ, जाग पाखरांना आली |
त्यांच्या कंठातील शीळ, गाते देवाची भूपाळी ||
झाली सकाळ सकाळ, आला वासुदेव दारी |
त्याच्या डोई मोरपीस, आणि ओठात बासरी ||
झाली सकाळ सकाळ, घाट गोर्‍ह्याची वाजली |
आणि नंदिनीची कूस, कुपी अमृताची झाली ||
झाली सकाळ सकाळ, सरे तिमिराची मिठी |
जाईजुईच्या कळ्यांना, सुटे सुगंधाची दिठी ||
झाली सकाळ सकाळ, उठा देवा नारायणा |
पाहा झंकारु लागली, ब्रह्मवादिनीची वीणा ||
झाली सकाळ सकाळ, जागे चराचर झाले |
उमटली अंगणात, पहा देवाची पाऊले ||
=================================================================
 २.]   उठि रे घननीळा, उठि बा गोपाळा |
पूर्व दिशेला देव उमटला, वाढवेळ झाला ||
गोठ्यामधल्या उठल्या धेनू खग उठले वृक्षी |
तुझी प्रार्थना ऐक श्रीधरा चिवचिवती पक्षी |
दर्शनमात्रे दारी जमला भक्तांचा मेळा ||
उठि रे घननीळा, उठि बा गोपाळा ||
भवभय हारक दीनोद्धारक अशी तुझी ख्याती |
वेदापूर्वी सानथोर तुज अहर्निश ध्याती |
त्यांना कुक्षी कवळुन घेणे ब्रीद तुझे वत्सला ||
उठि रे घननीळा, उठि बा गोपाळा |
पऊर्वदिशेला देव उमटला, वाढवेळ झाला ||